भाजपच्या पंढरपूर यशात ‘ सिंहाचा ‘ वाटा

एकास एक उमेदवार देण्याची यशस्वी रणनीती आ.रणजितसिंहांची

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला जो विजय मिळाला तो पक्षासाठी अनपेक्षित असा आहे. कारण मतदार संघातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता एकास एक उमेदवार दिला तरच भाजपला विजयाची काही शक्यता दिसत होती. आणि ही रणनीती विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनीच आखली. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या धोरणावर काम करण्यासाठी गळ ही घातल्याचे समोर येत आहे. आणि त्यानंतरच भाजपला पंढरपूर मध्ये अनपेक्षितपणे एक आमदार मिळाला, भाजपच्या या यशात सिंहाचा ही वाटा आहे तो असा.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजप चालत नाही असा पारंपरिक समज आहे. तसेच इथे भालके, परिचारक आणि अवताडे हे तीन प्रबळ गट आहेत. या तीन पैकी अवताडे आणि परिचारक हे दोन गट एकत्र आणल्याशिवाय भाजपला विजय शक्य नाही. हे गणित सर्वांना माहिती होते. अवताडे आणि परिचारक यांच्यापैकी कोणी एकमेकाना पाठिंबा देतील का याबाबत सुरुवातीला काहीशी संशयाची परिस्थिती होती. त्यामुळे एकास एक उमेदवार द्यायचा असेल तर या दोन नेत्यांच्या मध्ये एकमत होईल आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा ही प्रामाणिकपणे काम करेल असा उमेदवार दिला जावा या हेतूने यासाठी आम रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विविध नावाची चाचपणी करून पाहिली.

युटोपीयन शुगर्स चा चेअरमन उमेश परिचारक, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख, कर्जत – जामखेडचे माजी आम राम शिंदे यांच्याही नावाची चर्चा झाली. आ.चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर या नावांवर जिल्ह्यातील नेत्यांना घेऊन चर्चा ही घडवली. त्यांतून इतर नावे मागे पडली आणि समाधान अवताडे यांची उमेदवारी निश्चित होऊन परिचारक यांनी त्यांचा प्रचार करण्याचे निश्चित झाल्याचे समजते.

वास्तविक पंढरपूर – मंगळवेढा येथील राजकीय परिस्थिती आणि दिवंगत आम.भालके यांच्याविषयी असलेल्या सहानुभूतीची ( जी प्रत्यक्ष मतदानातून दिसून ही आली ) परिचारक यांना कल्पना असल्याने त्यांनी निवडणूक बिनविरोध झाली तर बरे अशीच भूमिका आ.पाटील आणि फडणवीस यांच्यासमोर मांडली होती असेही समजते. मात्र दोघांची मते एकत्र केली, एकास एक उमेदवार दिला, प्रामाणिकपणे काम केले तर भाजपचा आमदार होऊ शकतो, अशी मांडणी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मांडली. आणि त्यानंतर भाजपने परिचारक यांना ही अवताडे यांना पाठिंबा देऊन सहकार्य करावे अशी यासाठी राजी केले.

या बदल्यात परिचारक यांना भाजपच्यावतीने विधानसभा सदस्यातून निवडून द्यायच्या कोट्यातून विधानपरिषदेवर संधी द्यायची असेही ठरल्याचे समजते आहे. आणि त्यानंतर मग परिचारक यांनी अवताडे यांची उमेदवारी स्वीकारून त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान केल्याचे दिसून आले. आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनीच एकास एक उमेदवार देण्याची रणनीती ठरवून भाजप नेत्यांना त्यावर काम करण्यास राजी केले आणि भाजपचा जिल्ह्यात एक आमदार वाढला.

आ.रणजितसिंह मोहिते – पाटील यांनीच शब्द देऊन राष्ट्रवादी चा बालेकिल्ला असलेला माढा लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळवून दिला. त्यापाठोपाठ माळशिरस विधानसभा निवडणुकीत ही थेट अभाविप चे प्रचारक असलेले राम सातपुते यांची उमेदवारी फडणवीस यांच्या आग्रहाखातर स्वीकारून त्यांनाही निवडून आणले. त्याचबरोबर आता पंढरपूर सारखा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जिंकून घेण्यात ही आ. रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी सिंहाचा वाटा उचलला. यामुळे आ.रणजितसिंह मोहिते – पाटील यांचा भाजपमधील प्रभाव आणखी वाढला असून प. महाराष्ट्रात भाजपला सक्षम नेतृत्व नव्हते, आ.रणजितसिंह मोहिते – पाटील यांच्या रूपाने ते मिळाल्याने दिसत आहे. त्यामुळेच भाजपला येथे आपली पाळेमुळे घट्ट करण्यास मोठी मदत होत असल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!