भाजपचा प्रचार भरकटला

राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यामुळे स्थानिक प्रश्नांना बगल

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचार सभांमध्ये भारतीय जनता पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व अन्य अपक्ष उमेदवारांकडून सत्ताधारी महा. विकास आघाडी विरोधात राज्यस्तरावरील आरोप-प्रत्यारोप व समस्या बाबत मतदारसंघात सातत्याने टीका होत असल्यामुळे स्थानिक प्रश्न बाजूला राहिले आहेत. विशेषतः भाजप चा प्रचार तर पूर्णपणे भरकटला असून अगदी पाकिस्तान, चीन चे आणि बांगलादेश निवडणुकीचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे ही पोट निवडणूक लोकसभेची की विधानसभेची आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक नेते पंढरपूर व मंगळवेढा परिसरामध्ये प्रचाराच्या निमित्ताने येत आहेत. विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवेढा तालुक्यातील व पंढरपुरातील ग्रामीण भागांमध्ये प्रचारसभा घेतल्या. सभांमध्ये नेत्यानी राज्य सरकार कशा पद्धतीने अन्याय करत आहे ही भूमिका मांडत आपला प्रचार त्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तर संजय राठोड, सचिन वाझे, धनंजय मुंढे, गृहमंत्र्यांचा राजीनामा हा विषय देखील मतदारसंघात उचलून धरला जात आहे.

माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी प्रचार करत असताना माढा मतदार संघामध्ये संजय शिंदे यांना ज्या पद्धतीने पराभूत व्हावे लागले, त्या पद्धतीने पंढरीमध्ये भालके यांना पराभूत व्हावे लागेल असे सांगत, उपसासिंचन योजना अस्तित्वात न येता त्या भागातील लोकांना बादलीभर पाणी देखील मिळणार नाही असे सांगितले. राज्य सरकार लवकरच पायउतार होणार असून भाजपचे सरकार येणार आहे, असेही सांगायला ते विसरले नाहीत

विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी ही निवडणूक राज्यस्तरीय प्रश्नांवर सुरू केली असून राज्यातील नेत्यांवर टीका टिप्पणी करत मतदारसंघातील मूळ समस्या बाजूला ठेवल्या आहेत.आम.भारत भालके यांच्या निधनानंतर ही त्यांच्यावर टीका करण्याची संधी आ.परिचारक यांनी सोडलेली नाही. भगीरथ भालके यांच्यावर अतिशय तिखट शब्दांत केलेली टीका, महिलांचे अश्रू आणि ग्लिसरीन चा संदर्भ लोकांना रचलेला नाही असे दिसले. राज्य सरकार दळभद्री पांढऱ्या पायाचे आहे, कोरोना कमी करण्यात त्यांना यश आले नाही. पाणी प्रश्नांवर संदर्भहीन टीका करताना आपण किंवा भाजप या प्रश्नी काय करणार हे सांगितले नाही. अशाप्रकारे स्थानिक समस्या बाजूला ठेवत राज्यस्तरीय विषयावर परिचारक यांनी आपल्या भाषणात मुद्दे मांडले आहेत

दुसऱ्या बाजूला मोहिते-पाटील यांचे कुटुंब मतदारसंघात ठाण मांडून असून त्यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना कशी गरजेचे आहे हे सातत्याने टाकून सांगण्यास सुरुवात केली आहे. 2009 साली विजयसिंह मोहिते-पाटील यांना निवडून दिले असते, तर पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता असेही सांगितले जात आहे. एकीकडे ही योजना होणार नाही असे सांगितले जाते तर दुसरीकडे आम्ही निवडून आल्यानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता असे सांगितले जात आहे.

प्रा.लक्ष्मण ढोबळे यांच्या वक्तृत्वाची जिल्ह्याभरात जादू चालत होती.मात्र अलीकडे तेही भरकटले आहेत. कधी काळी भाजप, जनसंघ यांना शिव्या देणारे आणि उठ सूट फुले शाहू आंबेडकर नावाचा जयघोष करणाऱ्या ढोबळे यांना आता भाजप सात्विक पक्ष वाटतो आहेत तर फुले, शाहू,आंबेडकर यांच्या नावावर फुली मारून ढोबळे आता श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय यांच्या नावांवर शब्द सुमनांची उधळण करीत असल्याचे दिसते. मुंढे, राठोड यांच्यावर टीका करताना ढोबळेंची पातळी हादग्याचा महिना आणि कुत्र्याचा माज इथपर्यंत घसरत आहेत.

भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना तर मतदारसंघाच्या प्रश्नांची जाण नसल्याचे दिसून येते. आपली खाजगी ठेकेदारी त्यांना बेरोजगरीवरचे कायमचे उत्तर वाटते. आणि आम.भालके यांच्या विकास निधीतून उभा राहिलेल्या सभा मंडपात उभा राहून 11 वर्षात भालके नी काय केले अशी विचारणा करतात. याव्यतिरिक्त अवताडे यांच्याकडून मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन मांडलेच गेलेले नाही. त्यामुळे भाजपचा प्रचार मतदारसंघातील प्रश्न सोडून राज्य आणि राष्ट्रीय तसेच व्यक्तिगत पातळीवर घसरत असल्याचे दिसते.

तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी महा विकास आघाडीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्व.भारत भालके यांची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी भगीरथ भारत भालके यांना विधानसभेमध्ये पाठवा असे आवाहन केले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगीरथ भालके हे सत्ताधारी आघाडीचे आमदार असणार आहेत, त्यामुळे आचारसंहिता संपताच मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जाईल अशी ग्वाही दिलेली आहे. स्वतः उमेदवार भगीरथ भालके हे सुद्धा 11 वर्षात आ. भालके यांनी केलेली विकास कामे, 42 गावची पाणी पुरवठा योजना, म्हैसाळ च्या पाण्यासाठी चे प्रयत्न, 35 गावची उपसा सिंचन योजना, पंढरपूर शहरातील विकास कामे यावर बोलत आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख आघाड्यांची प्रचार पातळी, पद्धती, प्रचारातील मुद्दे लक्षात घेता भाजप भरकटला असल्याचे मतदारांतून बोलले जात आहे.

पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघ 2009 साली अस्तित्वात आला, तत्पूर्वी मंगळवेढा – मोहोळ भागातील काही गावे हा राखीव मतदारसंघ अस्तित्वात होता. मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भाग पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे. यावर अगोदर 20 वर्षे लक्ष्मणराव ढोबळे यांनी तेल धोंडा, चाळीस धोंडा पाण्याच्या योजनांबाबत वीस वर्ष राजकारण केले. मात्र भारत भालके यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजना कागदावरून प्रत्यक्षात साकार होऊ शकते हे जनतेला पटवून दिले.त्या नंतर गेले अकरा वर्ष या योजनेत अधिवेशनामध्ये, सर्वेक्षणासाठी निधी मंजूर करेपर्यंत, कार्य केले मात्र कोरोनामुळे त्यांचा बळी गेला. मात्र 2014 ते 19 च्या काळात त्यांनी चाळीस गावांसाठी भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पूर्ण करून घेतली. मतदार संघातील जनतेच्या गरजा काय आहेत याचा अभ्यास स्व भालके याना असायचा. अधिवेशनामध्ये सातत्याने मतदारसंघातील समस्या बाबत ते आवाज उठवत असायचे. पीकविमा, अतिवृष्टी, दुष्काळ, नापिकी भरपाई, रस्ते – वीज, आरोग्य, शिक्षण याच्या समस्या, संत बसवेश्वराचे राष्ट्रीय स्मारक, संत चोखामेळा सह मंगळवेढ्यातील काही संतांची संत सृष्टी उभारण्याबाबत त्यांनी आवाज उठवला होता.

Leave a Reply

error: Content is protected !!