पंढरपूर पिंजून काढलं : पती -पत्नी प्रचारात

भगीरथ भालके सपत्नीक प्रचारात

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीचे संकेत मिळताच वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके हे निवडणूक प्रचारात उतरले आहेत. विशेष म्हणजे प्रचार मोहिमेत त्यांच्या अर्धांगिनी डॉ. सौ.प्राणितीताई भालके यांची साथ मिळत आहे. भालके दाम्पत्याने पंढरपूर शहर अक्षरशः पिंजून काढले असून प्रचारात आघाडी घेतली आहे.

डॉ.सौ.प्राणितीताई भालके यांच्या गृह भेटीला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची उमेदवारी आ. प्रशांत परिचारक यांना मिळते की दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांना मिळते हे स्पष्ट झालेले नाही. मात्र दिवंगत आम.भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून आपली उमेदवारी निश्चित समजून प्रचाराला सुरुवात केली आहे.

व्हीडिओ पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.

पंढरपूर तालुक्यातील सर्व 22 गावात भगीरथ भालके यांचा संपर्क असून त्याच वेळी त्यांनी पंढरपूर शहरात ही प्रत्येक वार्डात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. दररोज सकाळी मंगळवेढा तालुका आणि संध्याकाळी पंढरपूर शहरात 6 ते 8 ठिकाणी बैठका घेत आहेत. त्याच बरोबर दुपारच्या वेळेत नाराजांच्या घरोघरी जाऊन गाठी -भेटी घेत आहेत.

दरम्यान, भगीरथ भालके यांच्या अर्धांगिनी सौ. डॉ.प्राणितीताई भालके यांनी महिलांना सोबत घेऊन प्रचाराच्या मैदानात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे चांगले वक्तृत्व आणि महिला, युवतींशी सहज संवाद, भारत नानांची सून म्हणून लोकांमध्ये असलेले आकर्षण यामुळे डॉ.प्राणितीताई भालके यांचा गृहभेट दौरा कमालीचा प्रभावी ठरतो आहे.

दररोज शेकडो घरात जाऊन प्राणितीताई महिलांशी संवाद साधत आहेत, त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. स्व.भारत भालके यांच्या आठवणीना नागरिक आणि महिलांकडून उजाळा दिला जात आहे. अनेक ठिकाणी भारत नानांच्या आठवणीने लोक गहिवरले दिसून येत आहे. एकूणच भारत भालके यांच्या निधनानंतर 4 महिने झाले तरीही अजूनही लोकांच्या मनातील दुःखाची भावना कमी झालेली नाही. उलट निवडणूक जवळ येईल तशी, भगीरथ भालके आणि डॉ. प्राणितीताई भालके यांच्या भेटीनंतर लोकांच्या मनात भारत भालके यांचे स्थान किती अढळ आहे याची प्रचिती येत असल्याचे दिसते.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार अवताडे की परिचारक हे निश्चित होत नाही, अपक्ष उमेदवार शैला गोडसे, स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील यांनी ही प्रचाराचे नियोजन सुरू केले असले तरी भगीरथ आणि प्राणितीताई भालके या दाम्पत्याने पहिल्या टप्प्यात पंढरपूर शहर पिंजून काढत प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येते.

Leave a Reply

error: Content is protected !!