भंडीशेगाव येथे २ शेळ्या, १ बोकड आणि एक मेंढा चोरीस : पोलीस तपास सुरु
पंढरपूर : ईगल आय न्यूज
भंडीशेगाव (ता. पंढरपूर ) येथील शेतकऱ्याच्या जनावरांच्या शेडमध्ये बांधलेल्या २ शेळ्या, १ बोकड आणि १ मेंढा गुरुवार ( दि. ६ एप्रिल ) रोजी चोरीस गेला होता. मात्र दुसऱ्या दिवशी रात्री चोरून नेलेला मेंढा चोरटयांनी शेतकऱ्याच्या घराजवळ आणून बांधला आहे. चोराच्या या औदार्यामुळे माने कुटुंबीयास सुखद धक्का बसला आहे. चोरांनी परत आणून दिलेला मेंढा बघण्यासाठी परिसरातील लोक मात्र शेतकऱ्याच्या घरी गर्दी करू लागले आहेत. दरम्यान गुरुवारीच गादेगाव ( ता. पंढरपूर ) येथील हनुमंत जालिंदर बागल यांच्या शेळ्यांच्या शेड मधून ६ शेळ्या चोरीस गेल्या आहेत. एकाच रात्री या दोन्ही घटना घडलेल्या आहेत.
भंडीशेगाव येथील तरुण शेतकरी प्रशांत बाबासाहेब माने याच्या घरासमोर असलेल्या शेड मध्ये बांधलेल्या जनावरांपैकी २ शेळ्या, १ बोकड आणि १ मेंढा गुरुवारी मध्यरात्रि तर पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी चोरून नेले. सुमारे ६५ ते ७० हजार रुपयांच्या शेळ्या , बोकड आणि मेंढा याची चोरी झाल्याने माने कुटुंब दुःखी झाले होते. त्याच रात्री गादेगाव येथील हनुमंत जालिंदर बागल यांच्या शेळ्यांच्या शेड मधून जाळी कापून ६ शेळ्या चोरीस गेलेल्या आहेत. त्यामुळे गादेगाव, वाखरी, उपरी, भंडीशेगाव परिसरात शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.
२५ हजार रुपये किंमत ; ४० किलो वजनाचा मेंढा
चोरांनी परत आणून सोडलेला मेंढा प्रशांत माने यांनी ३ महिन्यांपूर्वी देव कार्यासाठी १० हजार रुपयांना विकत आणला होता. आता त्याचे वजन सुमारे ४० किलो असून बाजारात त्याची किंमत २५ हजार रुपयांहून अधिक आहे. हा मेंढा लोटेवाडी येथील म्हसोबाला सोडण्यासाठी आणला होता, चोरी झाली तेव्हाच याची चर्चा परिसरात सुरु झाली. देव कार्यासाठी आणलेला मेंढा चोरल्यानंतर देवाच्या भीतीने चोरटयांनी तो परत आणून सोडला असावा असा अनुमान काढला जात आहे.
विशेष म्हणजे यापैकी चोरीस गेलेला मेंढा प्रशांत माने यांनी धार्मिक कार्यासाठी ३ महिन्यांपूर्वी विकत आणला होता. मात्र शुक्रवारी मध्यरात्रिच्या सुमारास चोरटयांनी चोरून नेलेला मेंढा प्रशांत माने यांच्या घराजवळ परत आणून बांधून ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे माने कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच परिसरात हि खबर वाऱ्यासारखी पसरली. आणि हा मेंढा पाहण्यासाठी लोक माने यांच्या घराकडे येऊ लागले आहेत. पंढरपूर ग्रामीण पोलिसांना हि चोरीची खबर समजताच पोलीस माने यांच्या घरी गेले आणि पंचनामा करून आले. पोलीस आता चोरीचा पुढील तपास करू लागले आहेत.
शेळ्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला असण्याची शक्यता
चोरटयांनी घराजवळ बांधलेल्या २ शेळ्या, १ बोकड आणि १ मेंढा चोरून नेला मात्र त्यांचा कसलाही आवाज आला नाही. चोरांनी परत आणून बांधलेला मेंढा परत ल्यापासून ढेपाळल्यासारखा झालेला आहे. त्याची हालचाल मंदावली आहे. गोठ्यात शेळ्या जवळ बांधलेल्या एका म्हशींची हीच परिस्थिती असल्याने चोरटयांनी शेळ्या बेशुद्ध करण्यासाठी त्यांच्यावर स्प्रे मारला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.