भगीरथ भालके यांच्या सभेला उसळली गर्दी !

अयोजका विरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर : ईगल आय मीडिया

रांजनी (ता.पंढरपूर ) येथे आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार शुभारंभाच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोना संदर्भात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या कार्यक्रमासाठी परवानगी घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ता. अध्यक्ष विजयसिंह देशमुख (रा.कासेगाव, ता. पंढरपुर) यांच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके या उमेदवाराचे प्रतिनिधी विजयसिंह बाळासाहेब देशमुख यांनी रांझणी (ता. पंढरपुर) येथील रविवारी झालेल्या प्रचार सभेस व स्पीकर लावणेसाठी पत्राद्वारे परवानगी मागणी केली होती. त्यानुसार नेमुन दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रचारसभेस परवानगी दिली होती.

सभेच्या वेळी व्हीएसटी पथक प्रमुख अशोक वैजीनाथ नलवडे, एस.यु. नागटीळक, फोटोग्राफर अजित देशपाडे, वाहन चालक पंडीत इंगोले हे तिथे हजर होते. सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्याबाबत निर्गमित केलेल्या आदेशाचे सभेचे आयोजक यांनी उल्लघंन केल्याचे या पथकाला निदर्शनास आले.

यामुळे विस्तार अधिकारी व व्हीएसटी पथक प्रमुख अशोक वैजीनाथ नलवडे यांनी विजयसिंह देशमुख यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देशमुख यांच्या विरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!