भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून 8 ठार

40 वर्षांची जुनी इमारत : 150 लोकांचं वास्तव्य होतं

टीम : ईगल आय मीडिया

भिवंडीत धामनकर नाक्याजवळच्या पटेल कम्पाऊंड भागात 40 वर्षे जुनी 3 मजली इमारत कोसळली आहे. ‘जिलानी’ नावाची ही इमारत सोमवारी पहाटे ३.४० मिनिटांनी कोसळल्याचं समजतंय. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिक रहिवासी आणि अग्निशमन दलाचे जवानांकडून बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

‘एएनआय’नं दिलेल्या माहितीनुसार, मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनी २० जणांना कोसळलेल्या इमारतीच्या मलब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. अजूनही या इमारतीच्या मलब्याखाली २० ते २५ जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. ठाणे महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीतून काही जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. ‘एनडीआरएफ’ची एक टीम बचाव कार्यासाठी घटनास्थळी उपस्थित आहे.

सदर इमारत ४३ वर्ष जुनी आहे. सदर इमारती मध्ये ४० फ्लॅट्स असून एकूण १५० रहिवाशी वास्तव्यास होते. सदर घटनेत २५ ते ३० व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्या असून आतापर्यंत २० जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून आठ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सदर इमारत समावेश धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हता.

बचावकार्यासाठी घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे १५ जवान तसंच राष्ट्रीय आपत्ती दलाची एक तुकडी (३० जवान) उपस्थित असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!