भोसे परिवर्तन पॅनलचा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार न देण्याचा निर्णय
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना महामारीत भोसे गावातील मान्यवर नेत्यांचे निधन झाल्याने आणि छत्रपती खा. संभाजी राजे यांनी, राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्याबाबत केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत भोसे परिवर्तन पॅनेलने आपल्या गटाकडून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती, पॅनल समन्वयक प्रा. महादेव तळेकर यांनी दिली.
भोसे (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीसाठी पंचवार्षिक निवडणूक लागली असून ग्रामपंचायतीवर पाटील गटाची सत्ता राहिली आहे. छत्रपती खा. संभाजीराजे हे परवा पंढरपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आणि पंढरपूर तालुक्यातील मातब्बर नेत्यांचे कोरोना आजारामुळे निधन झाल्याच्या निमित्ताने राज्यातील सर्वच ग्रामपंचायती या बिनविरोध केल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
या आवाहनास प्रतिसाद देत भोसे परिवर्तन पॅनेलने आज एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पॅनल प्रमुख प्रा. महादेव तळेकर, गटाचे मार्गदर्शक मा. हनुमंत मोरे , भास्कर तळेकर, अजय जाधव, हरीचंद तळेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. तळेकर म्हणाले की, आम्ही यंदाची निवडणूक ही बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील पाच वर्षात ज्येष्ठ नेते यशवंतभाऊ पाटील, स्व. महादेव खटके, कोरोना आजारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, कृषिराज शुगरचे चेअरमन महेश पाटील, माजी प्राचार्य अनंतराव पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वैजिनाथ कोरके, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजाराम माळी, बाळासाहेब कोरके, प्रा. डॉ. प्रकाश कोरके अशा अनेकांचे यांचे निधन या काळात झाले आहे, त्यांच्या परिवारासोबत भोसे ग्रामस्थही दुःखात आहेत, अशा प्रसंगी राजकारण न करता आणि खासदार संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, आमच्या पॅनल कडून उमेदवार न देता आम्ही ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ज्या उमेदवारांनी यापूर्वी निवडणुकीचे अर्ज भरले आहेत ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी गटासोबत आम्ही त्या इच्छुक उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी आणि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करू, हीच खर्या अर्थाने आमच्या गावातील कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली असेल…
यावेळी विलास कोरके, विलास तळेकर , बाळासाहेब कोरके, ॲड. रमेश कोरके, राजकुमार टरले, अनिल बोराडे , औदुबर थिटे, बाळासाहेब थिटे, नवनाथ माळी , नवनाथ सुरवसे, अविनाश नाईकनवरे उपस्थित होते.