भोसे ग्रामपंचायत निवडणूक : उरली केवळ औपचारिकता

11 जागा बिनविरोध, सहा जागांसाठी एकतर्फी निवडणूक

टीम : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक लागली असून सत्ताधारी राजूबापू पाटील गटाच्या अकरा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. आता उर्वरित सहा जागांसाठी केवळ औपचारिकता म्हणून मतदान होणार आहे.

भोसे ग्रामपंचायतीवर स्थापनेपासून राजूबापू पाटील गटाची निर्विवाद सत्ता राहिली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांचे कोरोनामुळे निधन झाले. तसेच याच कालावधीमध्ये गावातील कोरोनामुळे अनेक ग्रामस्थांचे, तरुणांचे दुःखद निधन झाले. अशा वातावरणात ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी ग्रामस्थांची इच्छा होती.

भोसे ग्रामपंचायतीचा इतिहास पाहता विरोधकांना अपवाद वगळता एखाद दुसरी जागा मिळवता आली आहे. यंदाच्या निवडणुकीत ही फारसा चमत्कार होणार नसल्याची भावना मतदार ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे 6 जागांसाठी सुरू असलेली निवडणूक केवळ औपचारिकता असल्याचे मानले जाते.

या सर्व बाबींचा विचार करून पाटील विरोधी गटाने यंदाची ग्रामपंचायत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, मात्र काही इच्छुक उमेदवारांनी आपले निवडणूक अर्ज माघारी घेतले नाहीत.
परिणामी 17 जागांपैकी अकरा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत तर6 जागांसाठी आता औपचारिक निवडणूक लागली आहे.

दोन्ही गटांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेत रीतसर प्रचारास प्रारंभ केला आहे. गावात, वाडी – वस्तीवर जाऊन आपल्या उमेदवारांची चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत, त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून प्रत्येक मतदाराच्या मोबाईल मध्ये आपापल्या उमेदवारांचे नाव चिन्ह पोहोचवण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ लागली असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!