बिटरगावात बंदुकीच्या फायर चुकवून बिबट्याने वन विभागास दिला चकवा

टीम : ईगल आय मीडिया
‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचे शूटिंग ज्या बिटर गावात झालेय त्या अर्चिच्या गावात आलेला बिबट्या वन विभागाच्या सापळ्यास, बंदुकीच्या 3 फायरिंग ला चकवा देऊन “सैराट” झाला आहे. त्यामुळे वनविभाग पुन्हा बिबट्याच्या शोधार्थ थेट केळीच्या आणि ऊसाच्या रानात निघाला आहे.
गेल्या 8 दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा करमाळा तालुक्यात थरार सुरू आहे. त्याने 3 जणांचा बळीही सुद्धा घेतला असून अंजनगाव, लिंबेवाडी, या भागातून आता मोर्चा वळवला आहे. शुक्रवारी बिबट्या सैराट मुळे फेमस झालेल्या अर्चिच्या गावात म्हणजेच ‘बिटरगाव’ भागात पाहायला मिळाला .
येथील एका शेतात मका टोचायचे काम सुरू असताना एक महिलेला दबा धरून बसलेला हा बिबट्या दिसला, लगेच तिने जोरात ओरडत त्याच्या दिशेला दगड भिरकावीत असताना त्याने अंगावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सोबतचे लोकांनीही गोंधळ घालत दगडांचा भडिमार सुरू केल्यावर बिबट्याने माघार घेतली. वन विभागही तातडीने तयारीनिशी येथे आला व ट्रॅप लावला. बिबट्या नजरेस पडताच नेमबाजानी तीन फायर केले मात्र यावेळीही दुर्दैवाने बिबट्या निसटला . त्यानंतर बिबट्या लपलेल्या केळीच्या शेताला चारही बाजूने घेरण्यात आले .
दरम्यान बिबट्याच्या शोधासाठी वैदू जातीच्या लोकांनी एक गाडीतून त्यांची कुत्रीही आणली. शेजारी असलेल्या उसातून पळून जाऊ नये म्हणून जेसीबीच्या मदतीने ऊसही पडला, अंधार पडू लागल्याने भोवती ट्रॅक्टर आणून दिवे लावण्यात आले. परिसरातील शेकडो ग्रामस्थ हातात काठ्या कुऱ्हाडी व मशाली घेऊन सज्ज होते.
मात्र तीन तासाच्या प्रयत्नानंतरही बिबट्या निसटल्याने या परिसरातील त्याची दहशत अजून वाढली आहे. ढोकरी – बीटरगाव येथील ट्रॅप मधुन बिबट्याने पळ काढल्याने आता जवळपासच्या सर्व वस्तीवरील आणि ढोकरी , बिटरगाव, भिवरवाडी, वांगी 1 , वांगी 4 परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे .