रेडकावर केला हल्ला : ग्रामस्थांमध्ये घबराट
पंढरपूर : ईगल आय मीडिया
खेडभोसे ( ता. पंढरपूर ) परिसरात शुक्रवारपासून बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन गावकऱ्यांना होत होते. शनिवारी मध्यरात्री राजाराम गोरख पवार यांच्या घराशेजारी बांधलेल्या रेडकावरती बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला आहे. या घटनेमुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी दुपारी पाचच्या दरम्यान आप्पासो पवार हे ऊसाला पाणी देण्याचे काम करीत होते. यावेळी त्यांना बिबट्यासदृश प्राणी दिसला. बिबट्यासदृश्य प्राण्याने त्यांचा पाठलाग सुरू केल्याने ते धावत सुटले.
सदर घटनेनंतर वन अधिकारी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेबाबत माहिती घेतली. रात्री बारापर्यंत वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हालचालीवरती लक्ष ठेवून होते.
शनिवारी मध्यरात्री नंतर राजाराम पवार यांच्या घराशेजारी बांधलेल्या रेडकावर झालेल्या हल्ल्यात पाठीमागील पायाचा भाग फाटलेला आहे. तर इतर ठिकाणी जखमा आहेत.
घटनेबाबत वन विभागाला कळविण्यात आले आहे. बिबट्या सदृश्य प्राण्याच्या दहशतीमुळे खेडभोसे, शेवते, व्होळे, पटवर्धनकुरोली, देवडे, सुगाव भोसे गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या प्राण्याला पकडण्याची मागणी होत आहे.