फडणवीसांचे मुहूर्त कायम चूकीचेच : कामगार मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : ईगल आय मीडिया
भाजपचे दूध दरासाठीचे आंदोलन योग्य आहे, दुधाला दर मिळालाच पाहिजे . परंतु आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे. उद्या शासकीय सुटीच्या दिवशी व बकरी ईद असताना आंदोलन पुकारले आहे, अशा परिस्थिती त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कायम चुकीचेच मुहूर्त काढत काढत आहेत,त्यांना काय झालंय कळत नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.गडहिंग्लजमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना अलीकडे काय झालं समजत नाही. त्यांनी काढलेला मुहुर्त नेहमीच चुकीचा ठरत आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी अभिष्टचिंतन करण्याचे सोडून फडणवीसांनी भाजपा कार्यकारिणी बैठक घेत त्यांना अपशकून केला. तसेच बेईमान म्हणत टीका केली होती. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, ही कुठली संस्कृती? असा सवालही मंत्री श्री मुश्रीफ यांनी यावेळी केला
ना. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर असून आता नागरिकांनी काळजी घेतली नाही तर कोरोना महामारीचा विस्फोट कोणीही रोखू शकत नाही. लक्षणे दिसलेल्या रुग्णावर उपचार होतीलच मात्र अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी कोविंड तपासणीसाठी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. तरच ही महामारी आटोक्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी गांभीर्य समजून घेऊन अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.