टीम : ईगल आय मीडिया
भाजपनं आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रभारीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. ही जबाबदारी दिल्याबद्दल फडणवीस यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत. ‘गोव्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल,’ असा ठाम विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूर इथं ते पत्रकारांशी बोलत होते.
गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारनं राज्यात उत्तम काम केलं आहे. त्या आधारावर गोव्याची जनता आम्हाला पुन्हा एकदा निवडून देईल, असा विश्वास आहे.
गोव्यामध्ये गेली चार निवडणुका मी सातत्यानं जातोय. त्यामुळं तिकडची बरीचशी माहिती मला आहे. यावेळच्या निवडणुकीत आमचे आदरणीय नेते मनोहर पर्रीकर आमच्यासोबत नसतील. मात्र, त्यांनी पक्षाला जी दिशा दिलीय आणि पक्षाचा जो विस्तार केलाय, त्या आधारावर आम्ही यश मिळवू,’ असं फडणवीस म्हणाले.
‘महाराष्ट्र हा नेहमीच गोव्याच्या पाठीशी उभा राहिलाय. महाराष्ट्र भाजप गोव्याच्या निवडणुकीत नेहमीच सक्रिय राहिली आहे. यावेळी देखील महाराष्ट्र भाजपचंही निवडणुकीत सहकार्य राहील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांचंही मार्गदर्शन मिळणार आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या माझ्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, त्या समजून घेऊन मी लवकरच काम सुरू करेन,’ असं फडणवीस यांनी सांगितलं.