बेरीज करता – करता वजाबाकी झाली !

मतांची गोळाबेरीज प्रतिकूल : भाजपच्या अडचणी वाढल्या


पंढरपूर : ईगल आय मीडिया


पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत एकास एक उमेदवार देण्याच्या हेतूने अवताडे आणि परिचारक गटाची बेरीज करणाऱ्या भाजपची मोठ्या संख्येत वजाबाकी होत भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे अवताडे आणि परिचारक या दोन्हीही गटांच्या मतांची गोळाबेरीज वजा होत असल्याचे चित्र आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. दिवस पुढे जातील तसे निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होत आहे. मतविभागणी च्या जोरावर मागील 2 निवडणुका जिंकणाऱ्या भालके गटाला पराभूत करण्यासाठी यावेळी भाजपने परिचारक आणि अवताडे या दोन मातब्बर गटांना एकत्र केले, त्यांच्यात ताळमेळ घालून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही उमेदवारांना 2019 साली मिळालेली मते सुमारे 1 लाख 20 हजारांहून अधिक होती. भालके याना मिळालेल्या मतांपेक्षा ही गोळाबेरीज 30 हजाराहून अधिक असल्याने भाजपचे विजयाचे गणित जुळून आले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरतानाच यात दररोज वजाबाकी होत गेली.

भाजप उमेदवार समाधान अवताडे यांना सर्वात मोठा धक्का त्यांच्याच कुटुंबातून बसला असून चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांची बंडखोरी भाजपसमोरील सर्वात मोठी अडचण आहे. सिद्धेश्वर अवताडे जेवढी अधिक मते खेचून घेतील तेवढी मते समाधान अवताडे यांची कमी होतील. त्यामुळे सिद्धेश्वर अवताडे यांची वजा होणारी मते राष्ट्रवादी काँग्रेस साठी बेरीज ठरणार आहेत.

भाजपसाठी आणखी एक मोठी वजाबाकी असणार आहे ती शिवसेनेच्या मतांची. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप महायुती असल्याने सेनेची हक्काची असणारी मते यावेळी राष्ट्रवादी च्या पारड्यात पडणार आहेत. शिवसेनेचे बहुतेक सगळे पदाधिकारी, गाव पातळीवरील कार्यकर्ते राष्ट्रवादी च्या प्रचारात आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपची ही मोठी वजाबाकी होणार आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढलेले धनश्री परिवाराचे प्रमुख आणि काँग्रेसचे नेते प्रा. शिवाजीराव काळूनगे यांना 7 हजारांहून अधिक मते मिळाली होती, ते काळूनगे आणि धनश्री परिवार यावेळी राष्ट्रवादीच्या प्रचारात आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज वाढणारीच असल्याचे दिसते. तर मागील निवडणुकीत तटस्थ असलेले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड.नंदकुमार पवार यावेळी राष्ट्रवादी च्या प्रचारात आघाडीवर आहेत. कोणत्याही परिस्थितीत मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी ला आघाडी मिळावी यासाठी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते काम करीत आहेत.

दुसरीकडे मागील वेळी भाजप सोबत असलेले राहुल शहा, नगराध्यक्षा सौ.अरुणा माळी, नगरसेवक अजित जगताप, प्रशांत यादव, तानाजी खरात, अरुण किल्लेदार, दामोदर देशमुख यांचा बळीराजा परिवार, चरनु काका पाटील यांचे समर्थक या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रचारात आहेत. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील भाजपच्या मतांमध्ये आणखीन मोठी घट होण्याची शक्यता आहे.

पंढरपूर शहर आणि तालुक्यातील मतांचे गणित लक्षात घेता मागील निवडणुकीत भाजपसोबत असलेले सहकार शिरोमणी चे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय तर मोहिते पाटील समर्थक नगरसेवक सुरेश नेहतराव, संतोष नेहतराव बंधू, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल यांच्यासह अनेक आजी -माजी नगरसेवक यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहेत.

पंढरपूर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या प्रचारात आघाडीवर आहेत. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी धर्म पाळून राष्ट्रवादीच्याच प्रचारात आहेत. ही सगळी राजकीय परिस्थिती पहिली असता भाजपला अवताडे – परिचारक गटांची बेरीज करीत असताना मोठ्या वजाबाकीला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी ची एकंदरीत गोळाबेरीज वाढत असल्याचे राजकीय चित्र आहे. Evm मध्ये हे चित्र नेमके कसे उतरते भाजपची बेरीज जुळून येते की वजाबाकी होऊन राष्ट्रवादीचं गणित जुळवून आणते हे 2 मे रोजी समजणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!