टीम : ईगल आय मीडिया
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे त्यांच्या अंतर्विरोधामुळे आपोआपच पडेल, आम्ही ते पाडण्यात भूमिका बजावणार नाही, असं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
शिवसेना नेते खा संजय राऊत आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी झालेल्या भेटीनंतर आ. पाटील बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले, “आज संजय राऊत आणि देवंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांची भेट झाली की नाही याची मला माहिती नाही. राजकीय क्षेत्रात भिन्न विचारांचे भिन्न पक्षाचे लोक असे अधुनमधून भेटत असतात त्याचा अर्थ त्यात काही उद्देश आहे आणि त्यातून बातमी निर्माण होईल असं नाही. आज भाजपा कार्यकर्त्यांचं एक मोठं वेबिनार होतं, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते.”
“गेल्या नऊ महिन्यांत चर्चा सुरु आहे की हे सरकार जाणार आहे. या चर्चेमध्ये कधीही देवेंद्र फडणवीस, मी किंवा आमच्या कुठल्याच नेत्यांनी हे सरकार जाणार आणि आमचं सरकार येणार असं म्हटलेलं नाही. हे सरकार जाण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करत नाही. मात्र, आम्ही म्हणतो की हे सरकार अंतर्विरोधामुळं पडेल, पण जेव्हा पडेल तेव्हा पडेल आम्ही ते पाडण्यात भूमिका बजावणार नाही.”