स्वाभिमानी चा भारत बंद मध्ये सहभाग : जिल्हाभर आंदोलन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
शेतकऱ्यांसाठी जाचक असलेल्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर करीत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर च्या भारत बंद मध्ये सहभागी व्हावे, केंद्र सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या घरावर काळे झेंडे लावावेत असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे,अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी दिली. 8 डिसेंबर रोजी संपूर्ण जिल्हाभर स्वाभिमानीच्या वतीने आंदोलन केले जाणार असल्याचेही बागल यांनी सांगितले आहे.
8 डिसेंबर रोजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्यावतीने भारत बंद चे आवाहन करण्यात आले आहे. या बंद ला स्वाभिमानी चे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा जाहीर करीत स्वाभिमानी आंदोलनात सक्रिय असल्याचे जाहीर केले आहे.
याविषयी राज्यातील स्वाभिमानी च्या सर्व पदाधिकाऱ्यांची झूमद्वारे मीटिंग घेऊन शेट्टी यांनी आंदोलनाचा आढावा घेतला आणि सूचनाही केल्या. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
संघटनेच्या वतीने ठीक ठिकाणी केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच केंद्राच्या निषेधार्थ आणि काळ्या कायद्याविरोधात आपल्या घरावर काळे झेंडे लावावेत असे आवाहन ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.