कळाशी गावाजवळ वेगवान वाऱ्यामुळे नाव धरणाच्या बॅक वॉटर मध्ये बुडाली
टीम : ईगल आय न्यूज
उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये तळाशी येथे नाव उलटल्याने ६ जण बेपत्ता झाल्याची दुर्घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वेगवान वाऱ्याच्या झोताने नाव किनाऱ्याजवळ आल्यानंतर परत धरणाच्या पाण्यात गेली आणि पलटी झाली, असे प्रत्यक्ष पाहणाऱ्या कडून समजते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कूगाव ( ता.इंदापूर ) येथून कळाशी ( ता. इंदापूर ) दरम्यान लोक नावेतून ये जा करीत असतात. मंगळवार ( दि २१ ) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कूगावहून कळाशी येथे ७ लोकांना घेऊन निघाली होती.
कळाशी गावा जवळ आल्यानंतर वाऱ्याच्या झोतामुळे किनाऱ्या जवळ आलेली नाव परत पाण्यात एक किलोमीटरवर गेली आणि जोरात हेलकावे बसल्याने नाव पलटी झाली. या नावेत सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे होते. ते पोहून किनाऱ्यावर आले आणि ही घटना समजली.
त्यानंतर पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात येत आहे. यामध्ये एक जोडपे आणि त्यांच्या २ मुलांचाही समावेश असल्याचे समजते. या घटनेतील लोकांची नावे अद्याप समजलेली नाहीत.
( आम्ही या घटनेची माहिती अपडेट करीत राहु )