पत्नी बचावली मात्र दोन्ही बैलांचा मृत्यू : शेतकरी बेपत्ता
टीम : ईगल आय मीडिया
मुसळधार पावसानंतर नाल्यास आलेल्या पुरामुळे बैलगाडीसह घरी परतणारं शेतकरी दाम्पत्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना गुरुवारी (15 जुलै) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील निंभोरा ( ता. धरणगाव ) येथे घडली. यात बैलगाडीतील महिला बचावली, मात्र पती पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं बेपत्ता झालाय. बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही.
निंभोरा येथील शेतकरी भागवत भिकाजी पाटील (वय 55) आणि त्यांच्या पत्नी मालुबाई भागवत पाटील (वय 50) गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास निंभोरा परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पाटील दाम्पत्य बैलगाडीने घरी परतत होते.दरम्यान, निंभोरा ते खामखेडा या दोन्ही गावांच्या दरम्यान असलेल्या खैरी नाल्याला मोठा पूर आला. नाल्याच्या पुराचा अंदाज न आल्याने भागवत पाटील यांनी बैलगाडी नाल्यात उतरवली. मात्र, बैलगाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली.
या घटनेत मालुबाई पाटील यांनी वाहून जात असताना एका झाडाला पकडले त्यामुळे त्या बचावल्या आहेत. मात्र, भागवत पाटील व दोन्ही बैल पाण्यात दूरपर्यंत वाहत गेले. त्यामुळे दोन्ही मृत बैलांचा शोध लागला. परंतु वाहून गेलेले भागवत पाटील हे बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध घेतला जात आहे. शोधासाठी पोलिसांसह आख्ख गाव शोध मोहिम राबवत आहे.
भागवत यांच्या पत्नी मालुबाई ओढ्याच्या कडेपासून थोड्या जवळ होत्या. त्यामुळे त्या ओढ्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एका बाभळीच्या झुडपात अडकल्या. त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात काटे टोचले गेले आहेत. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी जळगावात पाठवण्यात आलं.