टीम : ईगल आय न्यूज
महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस ( क्र . पी एफटी ७६२३ ) नेपाळमध्ये नदीपात्रात कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील १४ प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. यामध्ये ३१ जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.
नेपाळला गेलेले हे सर्व जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव पिंपळगाव तळवेल या गावातले प्रवासी होते. हे सर्वजण १६ ऑगस्टपासून अयोध्या, नेपाळ, काठमांडू देवदर्शनासाठी गेले होते. १६ ते २८ ऑगस्टपर्यंत त्यांचा प्रवास होता, अशी माहिती मिळते आहे.
नदीत पडल्यानंतर ती बस तरंगत नदीच्या काठावर आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस कार्यालय तनहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी दिली आहे. अपघातात झालेल्या प्रवाशांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील काही प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात असताना महाराष्ट्रातील पर्यटकांची एक बस तनहून जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत कोसळली. महाराष्ट्रातील एकूण ११० भाविक तीर्थयात्रेसाठी नेपाळला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. मृतांमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. ३१ जण जखमी आहेत. यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पोखराहून काठमांडूला जात होती. यावेळी ती नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत पडली. नदीपात्रात बस कोसळल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक झाले आहे.
दरम्यान, पुनर्वसन विभागाचे अधिकारी हे जळगाव जिल्हाधिकारी, उत्तर प्रदेश मदत आयुक्त (रिलीफ कमिश्नर) यांच्या संपर्कात असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. अपघातावेळी ११० पर्यटकांच्या तीन बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होत्या. त्यापैकी ४१ जण प्रवास करत असलेली बस नदीत कोसळली.अपघातग्रस्त बसमधून १५-१६ जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर १४ प्रवाशांचा मृत्यू झाला. नेपाळ दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात असून पर्यटकांची माहिती मिळाल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जाईल, असे अनिल पाटील यांनी सांगितले.