करकंब येथे उजनी कालव्यात ट्रॅक्टर पलटी

तीन महिला व दोन बालकांचा मृत्यू : अपघातग्रस्त मजूर मध्यप्रदेशातील 

पंढरपूर  : eagle eye news

करकंब ता.पंढरपूर येथील देशमुख वस्तीच्या बाजूला असलेल्या उजनी कालव्यात ऊस तोडणी मजुरांना घेऊन निघालेला ट्रॅक्टर पडल्याने ट्रेलर मध्ये बसलेल्या 3 महिलांसह 2 मुले ठार झाली तर अन्य 5 जण जखमी झाले आहेत. मंगळवार ( दि. 13 डिसें.) रोजी रात्री सव्वा अकरा वाजता ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त मजूर मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील आहेत.जखमी मजुरांवर पंढरपूर आणि सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


यासंदर्भात अधिक वृत्त असे की, करकंब येथील दत्तात्रय मारुती वसेकर यांच्या ट्रॅक्टर ( एम एच 45, एस 1143 ) सोबत ऊस तोडणी वाहतुकीसाठी बदया सेनानी यांची मजुरांची टोळी काम करीत आहेत. या टोळीत 17 मजूर आहेत. करकंब येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर दोनसाठी 13 डिसेंबर रोजी दुपारी हे मजूर ऊस तोडणीसाठी संभाजी मारुती काटकर यांच्या शेतात गेले होते. ऊस तोडणीचे काम उरकून रात्री सव्वा अकरा वाजता परत येत असताना दत्तात्रय वसेकर यांच्या घराजवळ काही मजूर उतरले आणि बाकी मजुरांना घेऊन ट्रॅक्टर पुढे निघाला. बागवान वस्तीजवळ आल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीसह उजनीच्या कालव्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले, तसेच करकंब पोलीस ठाण्यास संपर्क साधन्यात आला. पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना बाहेर काढून करकंब ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याठिकाणी अरविंद राजाराम कवछे ( वय 2 वर्षे ) प्रिया नवलसिंग आर्या ( वय 1 वर्षे ) सुरीका विरसिंग डावर ( वय 16 वर्षे ) आणि रमकाबाई विरसिंग आर्या ( वय 23 वर्षे ) हे उपचारापूर्वीच मयत झाल्याचे  सांगितले. तर एक सोलापूरला सिविलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर सुनीता राजाराम कलछे ( वय 23 वर्षे )  ही महिला मयत झाली. सर्व मयत आणि जखमी कामगार हे रा.कोलकी, ता.वरला, जि. बडवाणी ( मध्यप्रदेश ) येथील आहेत. घटना घडल्यानंतर ग्रामीण रुग्णालय येथे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी भेट देऊन सर्वांची विचारपूस केली.  सरपंच आदिनाथ देशमुख,  बागवान ‌दत्तात्रय देशमुख वसेकर, नागा माळी आदीसह देशमुख वस्ती, वसेकर वस्ती, मदने वस्ती येथील लोक मदतीसाठी धावून आले.सुनील गंगाराम बारेला याने दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर चालक लहू खंडू खारे याच्या विरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!