टीम : ईगल आय मीडिया
अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावर श्री क्षेत्र देवगड फाटा भागात मध्य रात्री 2 वाजता स्विफ्ट आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. स्वीफ्ट कार ( क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८ ) औरंगाबादहून नगरकडे येत होती. देवगड फाट्याजवळ नगरकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसशी ( एमएच १९ वाय ७१२३ ) तिची धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले.
अपघातात कार बसच्या समोरील बाजूने घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक तुरळक होती. अपघात नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही. बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही. पहाटेची वेळ असल्याने दोन्ही वाहने भरधाव वेगाने जात असावीत. त्यातच चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. जखमींना ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे नेण्यात आले. परंतु पाचही जणांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. मृत्युमुखी पडलेले सर्व जण जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. नेवासा पोलीस या प्रकरणी पुढील कार्यवाही करत आहेत.