माघी एकादशीसाठी दिंड्याना प्रवेश नाही.
पंढरपूर : ईगल आय मीडिया
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरीत माघी यात्रेला येणाऱ्या दिंड्याना मनाई करण्यात आली असून 22 – 23 फेब्रुवारी रोजी विठ्ठल दर्शन पूर्णपणे बंद तसेच शहरासह बाजूच्या 10 गावांत संचारबंदी लागू केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आदेश जारी केले आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरीत पारंपरिक माघी यात्रा 22 – 23 रोजी साजरी होत आहे. याकरिता राज्याच्या काही भागातून पंढरीत वारकरी, दिंड्या येत आहेत. या दिंड्याना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पंढरीत प्रवेश नाकारण्यात आला आहे.
तसेच 22 फेब्रुवारी रात्री 12 ते 23 फेब्रुवारी रात्री 12 या दरम्यान विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असेल तर मंदिर समिती सदस्यांच्या हस्ते सपत्नीक 3 लोकांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात येणार आहे. तसेच यादिवशी मानाच्या ह भ प वासकर महाराज दिंडीस प्रातिनिधिक स्वरूपात 1 अधिक 5 लोकांना प्रवेश परवानगी दिली आहे.
पंढरपूर शहर, गोपाळपूर, वाखरी, गाडेगाव, कोर्टी, टाकळी, चिंचोली भोसे, कोठाळी, शिरढोन, भटुंबरे, शेगाव दुमाला या गावांत 22 – 23 फेब्रुवारी रोजी 24 तास पूर्णपणे संचारबंदी जाहीर केली आहे. या व्यतिरिक्त सामान्य वाहतूक सुरू राहील, मंदिर आणि पंढरपूर परिसरात कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी,
पोलीस आणि मंदिर समिती कर्मचारी याना सोशल डिस्टनसिंग, स्यानेटायझर, मास्क ऑक्सिमीटर, rat कोविड चाचणी आवश्यक केली आहे. यासह इतरही महत्वाच्या आदेशाची अंमलबजावणी कडक करण्यात यावी असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आदेशात म्हटले आहे.