केंद्रीय आरोग्यमंत्री माजी पंतप्रधानांची विचारपूस करण्यासाठी फोटोग्राफर घेऊन गेले

डॉ.मनमोहनसिंग यांच्या पत्नी नाराज : मुलगी आरोग्यमंत्र्यांवर भडकली

टीम : ईगल आय मीडिया

माझ्या वडिलांना भेटण्यासाठी येताना तुम्हाला फोटोग्राफरची गरज काय? ते प्राणीसंग्रहालयातील जनावर नाहीत, अशा शब्दांत, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यास गेलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यावर सिंग यांची मुलगी चांगलीच भडकली आहे. डॉ. मांडविया जेव्हा एम्समध्ये डॉ. सिंग यांची भेट घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत फोटोग्राफर होते. आणि ते फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाले आहेत.

त्यावेळी डॉ. सिंग यांच्या पत्नीने फोटोग्राफरला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत तो फोटो काढत राहिला. त्यामुळे डॉ. सिंग यांच्या पत्नी संतापल्या.

त्यानंतर डॉ. सिंग यांची मुलगी दमन सिंग यांनी थेट डॉ. मांडविया यांना जबाबदार धरत चांगलेच फटकारले आहे. माझे वडील आजारी आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे. आम्ही चिंतेत असताना तुम्हाला फोटो काढायचे कसे सुचते? ‘ माझे आई वडील खूप कठीण परिस्थितीतून जात आहेत. माझे वडील वयस्कर आहेत. ते कुठल्या प्राणीसंग्रहालयातील जनावर नाहीत,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

डॉ. मांडविया जेव्हा एम्समध्ये संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासोबत गेले तेव्हा माझी आई तेथे होती. त्यांनी फोटोग्राफरच्या उपस्थितीतला आक्षेप घेतला व त्याला बाहेर जाण्यास सांगितले. माझी आई वारंवार त्या फोटोग्राफरला बाहेर जाण्यास सांगत होती. मात्र, त्याने त्याकडे लक्ष दिले नाही आणि फोटो काढत राहिला. त्यामुळे त्या प्रचंड नाराज झाल्या असेही दमनसिंह म्हणाल्या.


काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, ‘भाजपवाल्यांना प्रत्येक गोष्टीत फोटो काढण्याची संधी मिळते. आरोग्य मंत्र्यांनी या शिष्टाचार भेटीत जनसंपर्काची संधी शोधणे शोभणारे नाही. ही बाब म्हणजे माजी पंतप्रधानांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ आणि प्रथा परंपरांचा अपमान आहे.’

Leave a Reply

error: Content is protected !!