भगीरथ भालकेंचे निरर्थक मौन : आणि शेतकऱ्यांचा वाढता संताप
पंढरपूर : ईगल आय मीडिया
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांचे गेल्या 4 महिन्यापासून असलेले निरर्थक मौन, बिलांच्या बाबतीत दिले जाणारे, सतत फोल ठरणारे तारखांचे वादे आणि मोबाईलवर ही नॉट रीचेबल असणे यामुळे सभासद आणि समर्थकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी निर्माण होत आहे. भगीरथ भालके यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालवणे जमत नसेल तर राजीनामा देऊन बाजूला व्हावे, असेही आता संचालकांसह सर्व सामान्य शेतकरी आणि सभासदांतुन बोलले जात आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके विधानसभा पोटनिवडणूकित झालेल्या पराभवानंतर लोकांच्या संपर्कातून बाजूला झाले आहेत. लोकांना त्यांची भेट तर दुर्मिळ झालेली आहेच, मात्र मोबाईलवर सुद्धा त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. त्यांचा फोन नेहमी नॉट रीचेबल असतो, आणि सुरू असला तरी उचलत नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि सभासद तसेच त्यांचे समर्थक ही मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत असे दिसते.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामातील शेतकऱ्यांची उसबिले, कामगारांच्या पगारी आणि तोडणी वाहतूक बिले अद्याप थकीत आहेत, ती कधी मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर यंदा कारखाना सुरू होणार की नाही याकडेही लक्ष लागले आहे. कारण इतर कारखान्याची हंगामपूर्व कामे पूर्ण होत आलीत, तोडणी वाहतूक ठेकेदारांशी करार आणि उचली देण्याचे कामही जवळपास पूर्ण झालेले आहे. तर दुसऱ्या बाजूला विठ्ठल सहकारी कारखान्यावर सध्या भयाण शांतता आहे.
कारखाना सुरू करण्यासंदर्भात कसलीही हालचाल सध्या दिसत नाही. त्यामुळे तोडणी वाहतूकदार दुसऱ्या कारखान्याकडे करार करीत आहेत आणि कामगार ही पर्याय शोधत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील थकीत बिल मिळणार की नाही याबरोबरच यंदा कारखाना सुरू होणार की नाही ? याचीही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन ते तीन महिन्यापासून भगीरथ भालके ना शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत ना कामगारांच्या ना समर्थकांच्या संपर्कात आहेत. दररोज चौकशी केली की ते पुणे,मुंबई इकडे असल्याचे सांगितले जाते. मागील तीन महिन्यात कारखान्याच्या कामात एक इंच ही प्रगती झालेली दिसली नाही मग मुंबई,पुण्यात भालके काय करतात ? असाही सवाल विचारला जात आहे.
कारखाना चालवणे जमत नसेल तर बाजूला व्हावे अशी मागणी त्यांची उघड आणि छुपे विरोधक करीत आहेतच आता त्यांचे समर्थक ही या मागणीचे समर्थन करू लागले आहेत. भगीरथ भालके यांनी आपल्या अनेक चुकांतून विधानसभा हातची घालवली आता कारखानाही घालवणार आहेत काय अशी विचारणा ही कार्यकर्ते एकमेकांना करीत आहेत. भगीरथ भालके यांच्या या ‘निरर्थक मौना’मुळे आणि फोन ‘नॉट रीचेबल’ असण्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला सुरुंग लागत आहेत आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य मात्र अंधकारमय होत आहे.