आ.अवताडे – परिचारक दिलजमाई : ना. पाटील करणार शिष्टाई ?


परीचारकांच्या वाड्यावर आज समेट घडवण्यासाठी बैठक 


पंढरपूर : ईगल आय न्यूज

मागील 4 महिन्यापासून भाजपचे आमदार समाधान अवताडे आणि भाजप नेते,माजी आम प्रशांत परिचारक यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदावर आणि मनभेदावर तोडगा काढण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शिष्टाई करणार असल्याचे समजते. दोन्ही नेत्यांमध्ये  समेट घडवण्यासाठी पक्षाचे खास दूत म्हणून चंद्रकांत पाटील आज परिचारक यांच्या वाड्यावर जाणार आहेत, यावेळी त्यांच्यासोबत आ.समाधान अवताडे सुद्धा असतील आणि दोन्ही नेत्यांमध्ये असलेले मतभेद बाजूला करण्यात येतील असे समजते.


पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपने पोटनिवडणुकीत विजय मिळवला आणि माजी आम.परिचारक यांच्या मदतीने समाधान अवताडे आमदार झाले. दोन्ही नेत्यांमध्ये 1 वर्षभर खूप चांगला संवाद आणि संपर्क राहिला. मात्र मागील सहा महिन्यात परिचारक आणि अवताडे यांच्यातील अंतर वाढत गेले. परिचारक समर्थकांनी  दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवून अवताडे अध्यक्ष असलेला हा कारखाना ताब्यात घेतला. त्याचबरोबर पंढरपूर शहरातील परिचारक समर्थक कार्यकर्त्यांनी अवताडे यांना वगळून कार्यक्रम सुरू केले. तर औद्योगिक वसाहतीच्या बैठकीला परिचारक यांना वगळून आ.अवताडे गेले. उलट परिचारक यांच्यावर सतत टीका करणाऱ्या नेत्यांशी अवताडे यांची सलगी वाढली.


 एकूणच मागील 6 महिन्यात भाजप मधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर येत होती. याचा परिणाम आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत होऊ शकतो हे ओळखून पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी पॅचअप मोहीम हाती घेतल्याच दिसते. त्याचाच एक भाग म्हणजे भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे सोमवारी मुक्कामी मंगळवेढा येथे आ. अवताडे यांच्या फार्महाऊसवर आहेत. शिवाय मंगळवारी सकाळी ते आम.अवताडे समर्थकांशी चर्चा करणार आहेत.
 मंगळवेढा तालुक्यातील अवताडे समर्थक दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खूप चिडलेले आहेत.

त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून पाटील हे मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पंढरीत विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर थेट परिचारक यांच्या वाड्यावर जाणार आहेत. यावेळी आ.समाधान अवताडेसुद्धा सोबत असतील आणि त्याठिकाणी दोन्ही नेत्यांसोबत चर्चा काढून मतभेदावर, झालेल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला जाईल असे समजते. या भेटीकडे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून ना.चंद्रकांत पाटील यांची ही शिष्टाई कितपत फलद्रुप होते हे मात्र पुढील काळातच स्पष्ट होणार आहे. 

Leave a Reply

error: Content is protected !!