महाविकास आघाडीच्या पाठींब्यावर स्वराज्य पक्षाकडून संभाजीराजे यांची चाचपणी
पंढरपूर : eagle eye news
माढा लोकसभा मतदार संघात उमेदवारीवरून भाजप मध्ये धुसफूस सुरु आहे तर विरोधी महाविकास आघाडीकडून अद्याप एकही चेहरा समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर गादीचे वारस छत्रपती संभाजीराजे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्या पाठींब्यावर स्वराज्य पक्षाचे उमेदवार म्हणून संभाजीराजे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चाचपणी करीत आहेत.
भाजपची डोकेदुखी : फलटण, अकलुजकरांचे सोईरसंबंध
विद्यमान खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीस अकलूजकर मोहिते – पाटील आणि फलटणकर रामराजे नाईक निंबाळकर यांचाही विरोध आहे. तर छत्रपती संभाजीराजे यांचे फलटण आणि अकलूजकरांशी नातेसंबंध असल्याने संभाजीराजे यांची उमेदवारी महाविकास आघाडीची सोयीची ठरणार आहे. भाजपासाठी संभाजीराजे यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.
माढा लोकसभा मतदार संघातून भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे, मात्र त्यांना भाजप मधूनच मोहिते – पाटील गटाचा विरोध होत आहे. तर विरोधी महाविकास आघाडीकडे अद्याप सक्षम उमेदवार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला असला तरीही पक्षात फूट पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सक्षम उमेदवार दिसत नाही. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी अभयसिंज जगताप, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र भाजप समोर हे दोन्ही उमेदवार सक्षम पर्याय ठरतील याविषयी महाविकास आघाडीचे नेते साशंक आहेत.
छत्रपती संभाजीराजे खा. निंबाळकरांना सक्षम पर्याय ठरतील भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाविषयी मतदारसंघात नाराजी आहे. मात्र विरोधी महाविकास आघाडीकडे निंबाळकर यांच्यासाठी सक्षम पर्यायी उमेदवार आजतरी दिसत नाही. छत्रपती संभाजीराजे यांची उमेदवारी मात्र खा. निंबाळकर यांना सक्षम पर्याय ठरतील. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे माढ्यातून निवडणुकीसाठी उभा राहिले तर निश्चित विजयी होतील. – प्रा. महादेव तळेकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष , स्वराज्य पक्ष
या पार्श्वभूमीवर छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी माढा लोकसभा मतदार संघातून स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरु केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे या मतदासंघात दौरे वाढलेले आहेत, स्वराज्य पक्षाचे संघटनात्मक कामही वाढवलेले आहे. शिवाय महाविकास आघाडीसोबत स्वराज्य पक्षाची आघाडी करण्याचेही संकेत मिळत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी संभाजीराजे यांचे प्राधान्य असले तरीही जागा वाटपात तडजोड म्हणून ऐनवेळी माढ्यातून निवडणूक लढवण्याची हि तयारी संभाजीराजे करीत आहेत असे दिसते.