25 लाखांचा निधी मंजूर : ग्रामस्थांच्या प्रयत्नास झेड पी ची साथ
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील चिंचणी (पुनर्वसन ) या गावाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. सोमवार ( दि25 ऑक्टोबर ) रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये चिंचणी या गावाला पर्यटनाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यासाठी या वर्षा करिता चिंचणी या गावाला 25 लाख रुपये निधी ची तरतूद करण्यात आलेली आहे. हे गाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणामुळे 1980 च्या सुमारास विस्थापित झालेल्या चिंचणी गावाचे पुनर्वसन पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली ग्रामपंचायत हद्दीत उजाड, बोडक्या माळ राणावर करण्यात एके होते. मात्र चिंचणी या गावाने गेल्या पंधरा वर्षांमध्ये पर्यावरणाचे संवर्धन करत वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची, वनौषधी ,फुलांची ,वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्यात आलेली आहे. यामुळे गावात नैसर्गिक वातावरण निर्माण होऊन पक्ष्यांचे, फुलपाखरे यांचे प्रमाण भरपूर आहे. गावामध्ये कोणत्याही कारणासाठी गेल्या चार वर्षा पासुन फटाके वाजवले जात नाहीत.
याच बरोबर प्रिसीजन उद्योग समूहाच्या सहकार्यातून गावातील संपूर्ण पाणीपुरवठा योजना सोलर यंत्रणेवर सुरू केली आहे. या गावांमध्ये असणारी अभ्यासिका, स्वच्छ व सुंदर शाळा, राहण्याची सोय, इत्यादी गोष्टीमुळे व शहरी लोकांना ग्रामीण जीवनशैली, परंपरा, खाद्यसंस्कृती हे समजण्यासाठी हे गाव पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. यासाठी गेल्या 5 वर्षांपासून ग्रामस्थ नेटाने, एकोप्याने तन मन धन लावून काम करीत आहेत. तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार बबनराव शिंदे यांनाही हे गाव विशेष आवडले असून त्यांनी गावाच्या विकासासाठी सतत पाठपुरावा करून ग्रामस्थांना बळ दिले आहे.
आ.बबनराव दादा शिंदे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करून भरीव निधीची तरतुद केली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी श्री दराडे यांनी या बाबतची घोषणा केल्यानंतर चिंचणीवर विशेष प्रेम असणाऱ्या आ.सुभाष देशमुख यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.
ग्रामीण पर्यटन म्हणून गावाची तयारी पूर्ण झालेली असताना जिल्हा नियोजन समितीने गावास ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यामुळे गावातील लोकांना गावांमध्येच रोजगार उपलब्ध होणार आहे. हे गावाच्या सार्वजनिक मालकीचे आणि सर्वांचा हिस्सा असणारे हे पहिलेच ग्रामीण व कृषी पर्यटन केंद्र आहे. यामुळे गावातील सर्वांना रोजगार उपलब्ध होणार असून गावचा विकास दर वाढण्यामध्ये मोठा सहभाग राहणार आहे .