कृषी पर्यटन म्हणून चिंचणी नावारूपास यावे : आ.शिंदे

चिंचणी येथे विविध विकास कामांचे उदघाटन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

चिंचणी या गावात दिलेला निधी शंभर टक्के योग्य ठिकाणी खर्च पडतो. त्यामुळे मदत करण्याची भावना वाढीस लागते. जे करणं शक्य आहे ते करू. गावात पर्यटन झाल्यास गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि चिंचणी हे गाव कृषी पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला यावं असे प्रतिपादन आ.बबनदादा शिंदे यांनी केले.

चिंचणी ( पिराची कुरोली, ता.पंढरपूर ) येथे डीपीडिसी तसेच आमदार निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उदघाटन आणि काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी सहकारमंत्री आ.सुभाष देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्री विठ्ठल सहकारीचे संचालक समाधान काळे, युवक नेते प्रणव परिचारक, पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर नाईकनवरे, गटविकास अधिकारी पिसे, शिक्षण विस्ताराधिकारी बिभीषण रणदिवे यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला गावातील विकास कामांची पाहणी आ. शिंदे आणि आ. देशमुख यांनी केली.

यावेळी पुढे बोलताना आ.बबनदादा शिंदे म्हणाले की, चिंचणीला ग्रामीण पर्यटन योजनेतून शासकीय निधी मिळवून देऊ, आमदार निधीतून अभ्यासिकेला 3 लाख रुपये देऊ, तसेच गावाच्या विकासासाठी भविष्यात ही आवश्यक निधी देऊ, ट्रेनिंग सेंटर साठी सुद्धा dpdc मधून निधी देऊ अशीही ग्वाही असेही आ. शिंदे यांनी दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.सुभाष देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, चिंचणी हे गाव माहिती नव्हते मात्र गेल्या काही वर्षात ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नामुळे गाव नावारूपास आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील एखादे गाव राज्याच्या नकाशावर असावे. या भावनेतून सोलापूर सोशल फाऊंडेशन माध्यमातून समृद्ध गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना भेटले की विनंती करीत आहोत की, त्यांनी विविध योजना आणि पुढाकार घेऊन सामुदायिक पणे आपापली गावं विकसित करावीत, अनेक गावे समृद्ध व्हावीत, यातून जिल्ह्यात समृद्धी यावी. जिल्ह्यास अनेक धार्मिक स्थळांचा वारसा आहे, या स्थळांचा ही नीटपणे वापर करून विकास होईल. तीर्थक्षेत्राचे मार्केटिंग झाले पाहिजे, पंढरपूरचे मार्केटिंग झाले नाही, पांडुरंग गरिबांचा देव हा प्रचार केला जातो.

आपले गाव, आपला तालुका, आपला जिल्हा कसा राज्यात नावारूपाला येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन करून आ. देशमुख म्हणाले की, सर्व प्रशासकीय विभागांनी आपल्या बैठका या गावात घ्याव्यात, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या पाहिजेत. शाळांच्या सहली या गावात आल्या पाहिजेत. मुलांना झाडांचे महत्व कळायला हवे. सोलापूर जिल्ह्यात झाडांची खूप गरज आहे. निसर्गाने दिलेल्या ऑक्सिजनमुळे इथे कृत्रिम ऑक्सिजनची गरज नाही. कृषी पर्यटन करीत असताना शहरातील लोकांमध्ये विकेंड ची हौस वाढीस लागली आहे. त्यांना सुट्टीचे दोन दिवस निवांत जायचं असतं असे हौशी लोक गावात आले पाहिजेत. पंढरपूरला आलेला माणूस या गावात भेटून गेला पाहिजे. गाव देशपातळीवर नावारूपाला येईल आणि देशातील लोक इथं येतील, असेही आम.देशमुख म्हणाले.

सुरवातीला प्रास्तविक श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शशिकांत सांवत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चंद्रकांत पवार,ज्ञानेश्वर सावंत,शिवाजी अनपट,हणमंत खर्चे,गोपाळ जाधव,मचिंद्रनाथ पवार,तुकाराम जाधव आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

error: Content is protected !!