मदत आणि बचावकार्य सुरू : 2005 ची पुनरावृत्ती
टीम : ईगल आय मीडिया
रात्रभर कोसळलेल्या पावसामुळं चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशिष्ठी आणि शिव नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं शहरात पाणी शिरले आहे. अनेक सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिक पाण्यात अडकले आहेत. या नागरिकांना बचावासाठी एनडीआरएफचे पथक चिपळूणमध्ये पोहोचले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफनं बचावकार्य हाती घेतलं असून एनडीआरएफचे एक पथक नुकतेच मुंबईहून चिपळूणमध्ये पोहोचले आहे. त्यामध्ये ४५ जवान असून पाच बोटी आहेत.
पावसामुळं नद्यांना पूर आला आहे. तर, एसटी स्टँड, परशुराम नगर पसिरात पाणी सातत्याने वाढत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. तर, एसटी बस आगाराला तळ्याचं स्वरुप आलं आहे. याशिवाय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून अनेक जण घरात अडकले आहेत.
चिपळूनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, पावसाचा जोर वाढला, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे, एनडीआरएफची टीमन पोहोचत आहे, इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचलं आहे. अनेकांच्या घरात खांद्यापर्यंत पाणी साचलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही बचावकार्य सुरू झाल्याची माहिती दिली आहे. गंभीर स्थिती असलेल्या घटना स्थळी लवकरात लवकर हेलिकॉप्टर सुविधा पोहचविण्याचे आदेश देण्यात आलेले असून संपूर्ण परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग सतत लक्ष ठेवून आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
तर, चिपळूणकरता एनडीआरच्या दोन टीम रवाना झालेले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वेगाने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात येत असून कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे. फूड पॅकेट्स व इतर मेडिकल सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.