मी नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो : ठाकरे
टीम : ईगल आय मीडिया
आजच्या भेटीदरम्यान, ‘आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची वैयक्तिकरित्या ३० मिनिटे भेट घेतली. सत्तेत एकत्र नाहीत याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. या भेटीत वावगं काहीच नाही. मी काही नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो’, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आज दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वैयक्तिकरित्या भेट झाली होती.
या संदर्भात पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधानांशी वैयक्तिकरित्या भेट झाल्याचं मान्य केलंय.
आज महाराष्ट्रातील महाआघाडीच्या तीन महत्त्वाच्या नेत्यांनी राजधानी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास ४५ मिनिटे ही भेटीसाठी निर्धारीत करण्यात आली होती. परंतु, जवळपास पावणे दोन तास ही बैठक सुरू होती. आजची झालेली भेट ही अधिकृत बैठक होती, असंही सांगण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरले नाहीत.
परंतु, या व्यक्तिगत भेटीमुळे एका वेगळ्या चर्चेलाही तोंड फुटलंय. उल्लेखनीय म्हणजे, आजच्या भेटीत मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण समिती उपप्रमुख आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हेदेखील उपस्थित होते.