सलग दुसऱ्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेपुर्वी पंढरीत : 65 एकर, चंद्रभागा नदी वाळवंट, दर्शन रांगेची पाहणी
पंढरपूर : eagle eye news
आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये वारकर्यांची मांदियाळी जमल्याचे दिसून येत आहे. पंढरीच्या वारीत वारकरी, शेतकरी, कष्टकरी असा त्रिवेणी संगम दिसून येतो. या भाविकांना शासनाच्यावतीने मागील वर्षीपेक्षा अधिक सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविकांना, वारकर्यांना कोणताही त्रास होणार नाही. याची प्रशासन पुरेपूर दक्षता घेत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 65 एकर पाहणी केल्यानंतर चंद्रभागा नदी येथे चंद्रभागेच्या पवित्र पात्रात पाय धुतले. यावेळी चंद्रभागेत भाविकांची विचारपूस करून छोट्या मुलांकडून वारकर्यांप्रमाणे चंद्रभागेत गंध लावून घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी आषाढी यात्रा सोहळ्यात भाविकांना प्रशासनाकडून पुरविण्यात येणार्या सेवा सुविधांची पाहणी करण्यासाठी पंढरपूर येथे आले होते. मुख्यमंत्र्यांनी या पाहणी.दौऱ्यात ६५ एकर, वाळवंट, दर्शन रांग येथे पाहणी केली आणि त्यानंतर वारकर्यांशी संवाद साधला, तसेच प्रशासकीय अधिकार्यांची बैठक घेतली. याप्रसंगी त्यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री गिरीष महाजन, आ. समाधान आवताडे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत, शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, शिवसेना नेते राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, मी पंढरपूरकडे येताना रस्त्यावरून येणारे भाविक पाहीले. मला या भाविकांमध्ये पांडुरंग दिसत होता. पंढरपूरकडे येताना मला संत निळोबाच्या पालखीचे दर्शन घेता आले. तसेच पंढरपूर येथे येवून पाहिले असता येथे स्वच्छता खुप चांगली असल्याचे दिसून आले. प्रशासनाला आदेश दिल्याप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट यंत्रणा उभारली आहे. भाविकांसाठी मिनी टॉयलेट, महिलांसाठी स्नानगृह दुप्पट संख्येने वाढविले आहे. यात्रेत प्रशासनाच्यावतीने १५ लाख वारकर्यांना शुध्द पाणी, ज्युस देण्यात येत आहे. तसेच आरोग्य शिबीर चार ठिकाणी आयोजित केले आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे चांगले काम सुरू आहे. प्रशासन चांगले काम करीत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, व्ही. आय. पी. दर्शनाच्या नावाखाली भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही असाच निर्णय घेण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांची बुलेट सवारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला ६५ एकर येथे पाहणी केली. यानंतर त्यांनी ६५ एकर येथून बुलेटवर बसून चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग, मंदिर परिसर येथे पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री तानाजी सावंत हे चक्क बुलेटवरून पाहणीचा फेरफटका मारताना पहिल्यांदाच दिसून आले. या बुलेटचे सारथ्य आ. समाधान आवताडे करीत होते.
वारकर्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यास प्राधान्य राहिले. मी सलग तिसर्या वेळी शासकीय महापुजेसाठी येत आहे. गेल्या वर्षी शासकीय महापूजा चालु असताना श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू ठेवले. त्यामुळे सुमारे दिड लाख भाविकांना दर्शन घेता आले. वारकर्यांचे दर्शनासाठी गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.