श्री विठ्ठलच्या संचालक मंडळाविरोधात राज्य सहकारी बँकेची पोलीस ठाण्यात तक्रार

५३.१५ कोटी थकीत कर्ज वसुलीसाठी गुन्हा दाखल करण्यात यावा !

पंढरपूर : eagle eye news

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या थकीत असलेल्या कर्ज वसुलीसाठी कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रतिकृत अधिकाऱ्यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडे केली आहे. दरम्यान, विठ्ठल सहकारी साखर कारखाना चांगलं चालत असल्याने अडचणी निर्माण करण्यासाठी करण्यात आलेली हि तक्रार राजकारण प्रेरित आहे, जुन्या संचालक मंडळाने काढलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी हि कारवाई असून यातून मार्ग काढला जाईल, असे प्रतिपादन चेअरमन अभिजित पाटील यांनी केले आहे.

ज्या कर्ज वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने हि तक्रार केली आहे, ते कर्ज २०२१ पूर्वीचे आहे, तरीही २०२२ साली आम्ही ३० कोटी रुपये बँकेकडे भरलेले आहेत. तरीसुद्धा हि कारवाई होत आहे. दोन वर्षे बंद असलेला कारखाना आमचे संचालक मंडळ चांगला चालवत आहे. त्यामुळे तालुक्यातील विरोधकांनी राज्य पातळीवरील नेत्यांकडे जाऊन कारखाना बंद पडावा, या हेतूने तक्रारी केलेल्या आहेत. राजकारण प्रेरित हि कारवाई असून यातून मार्ग काढला जाईल. – अभिजित पाटील,
चेअरमन, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना

यासंदर्भात अधिकचे वृत्त असे कि, ३१ डिसेम्बर अखेर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे २५२. ४९ कोटी कर्ज आणि १७७. ६८ कोटी रुपये व्याज असे एकूण ४३० कोटी रुपये कर्ज थकबाकी आहे. हे कर्ज पूर्वीच्या संचालक मंडळाने कारखान्याचे विस्तारीकरण, सह वीजनिर्मिती प्रकल्प आदींसाठी घेतलेले आहे. कारखान्याची मालमत्ता राज्य सहकारी बँकेकडे गहाणखत आहे, हे कर्ज २०२१ पूर्वीचे असून साखर विक्रीतून प्रति क्विंटल ८०० रुपये या दराने परतफेड करण्याचा करार त्यावेळच्या संचालक मंडळाने केलेला आहे.

२०२२-२३ च्या गाळप हंगामात साखर कारखान्याने ७ लाख २६ हजार १४२ टन उसाचे गाळप करून ६ लाख ६४ हजार २४० क्विंटल साखर उत्पादन केलेले आहे. या साखर विक्री नंतर प्रति क्विंन्टल ८०० रुपये प्रमाणे ५३.१५ कोटी रुपये संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेकडे कर्जापोटी भरणे आवश्यक होते, परंतु ते भरलेले नाहीत. त्यामुळे राज्य सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात ११ जानेवारी रोजी लेखी तक्रार दाखल केलेली आहे. राज्य सहकारी बँकेच्या या कारवाईमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!