आरोपीना अटक का केली नाही, म्हणत अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला
पंढरपूर : प्रतिनिधी
26 मे रोजी फिर्याद देऊन ही अद्याप आरोपीना अटक का केली नाही ? अशी विचारणा करीत फिर्यादी ने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातच अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात सदर फिर्यादीविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दि.2 जून रोजी दुपारी 12.45 च्या सुमारास रांजनी ता.पंढरपूर येथील विलास शामराव लिगाडे वय 46 वर्षे हा इसम पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी गुरसाळे बिट हवालदार पांडुरंग तुकाराम ढवळे हे कर्तव्यावर होते.
त्यावेळी विलास शामराव लिगाडे हा पोलीस ठाण्यात आला आणि मी 26 मे रोजी सुभाष मुरलीधर भोसले, दादासाहेब मुरलीधर आणि अतुल मुरलीधर भोसले यांच्या विरोधात तक्रार दिली होती. मात्र अजूनही त्यांना अटक का केली नाही असे म्हणत आरडा ओरड करू लागला. पोलीस निरीक्षक यांच्या केबिनकडे जाऊन मोठ्या आवाजात त्या लोकांना अटक करता का नाही ? अशी विचारणा करीत पोलीस ठाण्याच्या प्रवेश द्वारात येऊन जवळ असलेल्या बाटलीतील डिझेल अंगावर ओतून घेतले.
त्यावेळी पोलिसांनी लगेचच त्याला पकडून त्याच्याकडील बाटलीकाढून घेतली आणि त्याच्या खिशात असलेली काड्याची पेटी सुद्धा काढून घेतली. त्यानंतर आरोपी विलास लिगाडे याच्या विरोधात भादंवि कलम 309 नुसार गुन्हा दाखल केला आहे.