काँग्रेस आमदारांचे कोरोनामुळे निधन

सरसंघचालक मोहन भागवत यांना ही कोरोना

टीम : ईगल आय मीडिया

 देगलूर-बिलोली (जि. नांदेड) विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते ५५ वर्षांचे होते. अंतापूरकर यांच्यावर मुंबई रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

रावसाहेब जयवंत अंतापूरकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आले होते. मुंबई रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांचे निधन झाले.

रावसाहेब अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. अंतापूरकर यांच्या निधनानंतर चव्हाण यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. ‘माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना’, असे ट्वीट चव्हाण यांनी केले आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने नागपुरच्या किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देण्यात आली आहे. मोहन भागवत यांना काल शुक्रवारी सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांची तातडीने चाचणी करण्यात आली. त्यांची आरटीपीसीआर करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे.

रावसाहेब अंतापूरकर यांच्या रूपाने महाराष्ट्राने करोना संकटात दोन आमदार गमावले आहेत. याआधी पंढरपूर चे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचा करोनाच्या विळख्यात सापडून मृत्यू झाला असतानाच राज्याच्या विधानसभेने आपला आणखी एक सदस्य या साथीत गमावला.

Leave a Reply

error: Content is protected !!