खा. राजीव सातव यांचे निधन

आ. रजनी सातव यांचे सुपूत्र खा. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय : अल्पवयात लक्षणीय झेप!

टीम : ईगल आय मिडिया

काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव सातव यांचे आज सकाळी उपचार सुरू असताना निधन झाले. ते 45 वर्षांचे होते. राजीव सातव यांना एप्रिल मध्ये कोरोना झाला होता. उपचारासाठी त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नुकतेच ते कोरोना मुक्त झाले होते मात्र मागील 3 दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले.

राजीव सातव यांना २१ एप्रिल रोजी करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाले. अहवाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरूवातीला त्याची प्रकृती चांगली होती. मात्र, २५ एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई हलवण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होऊ लागली होती.

दरम्यान, शनिवारी (१५ मे) काँग्रेसचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयात जाऊन, सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेत विचारपूस केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘राजीव सातव यांना काल रात्र थोडा त्रास जाणवला, मात्र ते लवकरच बरे होतील,’ असं म्हटलं होतं मात्र, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपदही भूषवलं होतं.

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती

खा. सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत म्हणून खा राहुल गांधी यांनीही डॉक्टरांशी फोनवर चर्चा केली होती. राज्यातील बहुतांश काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावरील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली होती. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या सातव यांच्या निधनाने काँग्रेस ने एक उमदा नेता गमावला असून राज्यातील राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!