पंढरपूर : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांचा परिसर प्रतिबंधात्मक झोन म्हणून जाहीर केला जातो. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाने हे लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक झोन करताना शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. एखादा रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या घराच्या आसपासचा परिसर प्रतिबंधात्मक झोन म्हणून सील केला जात आहे. त्या परिसरातील रस्ते, दुकाने, दूध डेअऱ्याचेही रस्ते बंद केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शेतमाल ने – आन करणे, दूध वाहतूक करणे हे त्याच्यासाठी गैरसोयीचे ठरत आहे. प्रतिबंधात्मक झोन जाहीर करताना तो अनियमित काळासाठी असल्यामुळे शेतकऱ्यांची अनेक दिवस अडवनुक होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे प्रपंच भाजीपाला विक्री व दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहेत, अशा शेतकऱ्यांवर या प्रतिबंधात्मक झोनमूळे आर्थिक संकट कोसळत आहे. प्रशासनाने प्रतिबंधात्मक झोन करताना अशा शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आवाहन माऊली हळणवर यांनी केले आहे.
प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेवरून मार्ग झाला मोकळा
भोसे ( ता. पंढरपूर ) येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर तो परिसर सील करण्यात आला. त्यामुळे गावडेवस्ती येथील शेतकऱ्यांना ये जा करणे मुश्किल झाले. या भागात सुमारे 1200 लिटर दुध संकलन होते. ते मार्ग बंद झाल्याने ठप्प होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्या भागातील शेतकऱ्यांची कैफियत माऊली हळणवर यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे मांडली होती. ढोले यांनी वस्तुस्थिती ची माहिती घेत सोशल डिस्टनसिंग आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाय लागू करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याची सूचना भोसे येथील कोविड समितीला केली. त्यानंतर त्या भागातील शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला.