उद्या पासून 14 दिवस कडकडीत बंद

21 गावात 10 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यामधील 21 गावांमध्ये उद्या ( दि 26 ) सकाळी 7 वाजल्यापासून कडक संचारबंदी लागणार असून पुढील 14 दिवस या 21 गावात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान आजच्या अहवालात सुद्धा पंढरपुर तालुक्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या 110 आली आहे.

त्यामुळे उद्यापासून प्रशासनाने ज्या गावात 10 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आहेत, त्या कासेगाव ,भंडीशेगाव, करकंब, गादेगाव, पटवर्धन कुरोली, भोसे, खेड भाळवणी, रोपळे, लक्ष्मी टाकळी, मेंढापूर, गुरसाळे, उपरी, चळे, खरातवाडी, लोणारवाडी,सुपली, गार्डी ,खर्डी,सुस्ते, कोर्टी, आंबे या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लॉक डाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहतील. विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व दुकानदार , व्यापारी, फळे व भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते यांच्यासह इतर व्यावसायिकांची आठवड्यातून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मोहिमेत चाचण्या वाढविण्यासाठी ‘नो टेस्ट नो रेशन’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

कोरोना संख्या जास्त असलेल्या गावात 10 पेक्षा कमी रुग्ण संख्या येईपर्यंत किंवा 14 दिवस हे कडक निर्बंध लागणार आहेत. या संदर्भात कोरोना संसर्गावर नियत्रंण मिळविण्यासाठी नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!