पंढरपूरच्या राजकीय साठमारीत कोविड हॉस्पिटल रखडले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येथे कोरोना बाधित रुग्णांसाठी कोविड हॉस्पिटलची गरज असूनही गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला हॉस्पिटलच्या जागेचा शोध अजूनही संपलेला नाही. राजकीय नेत्यांच्या साठमारीत हॉस्पिटल मात्र रखडले आहे. राजकीय नेत्यांनी शांत राहून प्रशासनावर हॉस्पिटलचा विषय सोडल्यास तातडीने मार्ग निघेल आणि हॉस्पिटल उभा राहील असे नागरिकांतून बोलले जात आहे.


पंढरपूर शहर आणि तालुक्यात स्थानिक प्रशासनाने नियमांचे पालन केल्यामुळे तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढलेले नाहीत. आता नव्याने रुग्ण नाही सापडला तर येत्या 4 दिवसांत पंढरपूर तालुका कोरोनामुक्त होणार आहे. केवळ प्रशासनाच्या कामगिरीमुळेच हे यश साध्य झालेले आहे. पालकमंत्र्यांनी या प्रयत्नांचे कौतुक करून जिल्हाभर पंढरपूर पॅटर्न राबवावा अशी सूचना केली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नावर राजकारणामुळे मात्र पाणी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून पंढरपूर शहरात आमदार भारत भालके आणि आ प्रशांत परिचारक यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. कधी नगरपालिकेवरून, कधी abcd पॅटर्नवरून, तर कधी कोविड हॉस्पिटलवरून या दोन्ही लोकप्रतिनिधीमध्ये किंवा त्यांच्या समर्थकांमध्ये हमरी-तुमरी सुरू आहे. जोवर हे नेते शांत होते तोवर प्रशासनाने सामाजिक संघटनांच्या सहकार्याने सगळी परिस्थिती कुशलतेने हाताळली. मात्र प्रशासकीय निर्णय आणि अंमलबजावणीमध्ये नेत्यांचा हस्तक्षेप वाढल्यानंतर शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
मागील एक महिन्यापासून शहरातील कोविड हॉस्पिटलचा शोध संपलेला नाही. दोन्ही आमदारांना आपल्या सोयीने हॉस्पिटल हवे आहे, तर प्रशासनाचे प्रश्न वेगळेच आहेत. त्यामुळे हे त्रांगडे कधी सुटणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कोरोना हॉस्पिटलसाठी सुरुवातीला 100 बेडचे अतिदक्षता सुविधा असलेल्या हॉस्पिटल ची आवश्यकता जिल्हा प्रशासनाने कळवली होती. परंतु आता कोरोनाचा प्रसार नियंत्रित झाल्यामुळे सध्या 50 बेडचे हॉस्पिटल पुरेसे आहे असे जिल्हा प्रशासनाचे मत आहे.
पंढरपूर शहर आणि तालुक्यासाठी वाखरी एम आय टी येथे कोविड केअर सेंटर्स सुरू आहे, आणि आजवर सापडलेले रुग्ण याच ठिकाणी बरे झाले आहेत. वयस्क, अति गंभीर कोरोना रुग्णांसाठी कोविड हॉस्पिटलची गरज भासणार आहे. सध्याही पंढरपूर येथील नियंत्रित परिस्थिती पाहता, कोरोना सेंटर्सची पुरेशी संख्या आणि ती वाढवण्यासाठी पर्याय असल्याचे पाहून किमान 20 बेडचे हॉस्पिटल कोविडसाठी पुरेसे होईल असे स्थानिक प्रशासनाचे मत आहे. मात्र एवढ्या क्षमतेचे, सुविधा उपलब्ध असलेले हॉस्पिटल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते कसे मिळणार नाही यासाठीच राजकीय नेते प्रयत्न करीत असल्याचे दिसते. उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात यावे असे आमदार भारत भालके यांनी सुचवले असता, आ. परिचारक समर्थकांनी त्यास विरोध केला आणि तो प्रयत्न हाणून पाडला. त्याच वेळी पंढरपूर नगरपालिकेने हॉस्पिटल 65 एकर येथे व्हावे, त्यासाठीच निधी पालिका खर्च करेल अशा प्रकारचा ठरावही केला.
मात्र अद्यापही हॉस्पिटलसाठी जागा निश्चित होत नाही.

पंढरपूर शहर व तालुक्यात आजवर केवळ सात कोरोना पॉजीटीव्ह रुग्ण आढळून आले. येथील covid-19 केअर सेंटर मध्ये यशस्वी उपचार करून रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या केवळ एका लहान मुलावर उपचार सुरू आहेत. ते मूलसुद्धा लवकरच बरी होऊन घरी परतणार आहे. गुरुवारी घेतलेले 20 नमुने निगेटिव्ह आल्यामुळे शनिवार अखेर नव्याने एकही रुग्ण समोर आलेला नाही. त्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुका आज घडीला कोरुनामुक्त आहे असे म्हणता येईल.

स्थानिक नेते मंडळी यांना शहरातील नागरिकांची त्यांच्या आरोग्याची काळजी आहे की, आपल्या राजकारणाची चिंता असा प्रश्न पंढरपुरकरांना पडला आहे. प्रशासकीय प्रयत्नामुळे पंढरपुरात कोरोना नियंत्रित राहिला आहे. अन्यथा कोरोनाचे रुग्ण वाढले असते तर या रुग्णांची सोय कुठे झाली असती असा प्रश्न उभा राहतो आहे.
शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या बैठकीतसुद्धा हॉस्पिटल च्या जागेवर मार्ग निघाला नाही. त्यामुळे स्थानिक राजकीय नेत्यांनी कोविड हॉस्पिटलचा प्रश्न प्रशासनाच्या हातात देऊन शांत बसावे अशीच अपेक्षा पंढरपूरकर व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!