24 तासांत 6 हजार 218 नवीन रुग्ण
टीम : ईगल आय मीडिया
आज ( दि.23 फेब्रुवारी ) रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या कालच्या तुलनेत वाढली असून आज 6 हजार 218 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यासाठी ही चिंतेची मानली जात आहे.
राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांत कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 6 हजार 218 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तसेच, 5869 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.96 टक्क्यांवर आहे. तर दिवसभरात 51 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.45 टक्क्यांवर आहे. अशाच प्रकारे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली, तर आगामी काळात हा मृत्यूदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख 12 हजार 312 वर पोहोचला आहे. काल राज्यात 5 हजार 210 कोरोनारुग्णांची नोंद झाली होती. तर काल दिवसभरात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबाद, ठाणे, नाशिक या शहरांमध्ये सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजारोंच्या संख्येने आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आगामी काळात अशाच प्रकारे कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. सध्या राज्यात पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 9399 एवढी आहे. तर मुंबई, ठाण्यात अनुक्रमे 6119 आणि 6177 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. अमरावतीमध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 5595 एवढी आहे. तर नागपुरात सक्रिय कोरोनाग्रस्तांचा आकडा 6832 वर पोहोचला आहे.