24 तासात 57,000 नवे रुग्ण

कोरोनाचा कहर कायम :222 जनांचा मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात काल कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून गेल्या २४ तासांत राज्यात विक्रमी ५७ हजार ७४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. दिवसभरात २२२ जण दगावले आहेत तर २७ हजार ५०८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, राज्यातील रुग्णांची संख्या वाढून ४ लाख ३० हजार ५०३ इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात करोना संसर्गाने थैमान घातले आहे. दैनंदिन रुग्णसंख्या रोज नवे उच्चांक गाठताना दिसत आहे. करोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानावर असताना करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणा आणि सरकारचीही झोप उडाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेऊन राज्यात ३० एप्रिलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असतानाच आजची आकडेवारी हाती आली असून हे आकडे धडकी भरवणारे आहेत.

राज्यात आज ५७ हजार ७४ नवीन रुग्णांची भर पडली असून एकट्या मुंबई पालिका क्षेत्रातच ११ हजारांवर नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुणे आणि नागपूर या शहरांतील आकडेही काळजीत भर टाकणारे आहेत. पुणे महापालिका हद्दीत गेल्या २४ तासांत ६ हजार ३२१ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर नागपूर पालिका हद्दीत ३ हजार १११ नवे बाधित आढळले आहेत.

राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ४ लाख ३० हजार ५०३ इतका झाला असून त्यात पुणे जिल्हा पहिल्या स्थानी आहे. पुणे जिल्ह्यात सध्या ८१ हजार ३१७ एकूण रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ मुंबई पालिका क्षेत्रात ६६ हजार ८०३ रुग्णांवर उपचार सुरू असून नागपूर जिल्ह्यात ५३ हजार ६३८ तर ठाणे जिल्ह्यात ५३ हजार २३० रुग्ण आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!