दिवाळीनंतर कोरोनाच्या दिवाळीला सुरुवात

सलग दोन दिवस राज्यात नवीन बाधित आणि मृत्यूची संख्या वाढली

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात दिवाळीनंतर करोनामृत्यू आणि नवीन बाधितांची संख्या सतत वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात दुसरी लाट सक्रिय होण्याची भीती व्यक्त होत आहे. शुक्रवारी राज्यात १५५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण मृत्यूची संख्या ४६ हजार ५११ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात ५ हजार ६४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ६ हजार ९४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आतापर्यंत एकूण १६ लाख ४२ हजार ९१६ कोरोना बाधितांनी आजारावर मात करण्यात यश मिळवले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात एकूण १ कोटी ३५ लाख ६६५ करोना चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातील १७ लाख ६८ हजार ६९५ (१७.६२ टक्के ) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

दिवाळीनंतर राज्यात नवीन बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाकडून आवश्यक असलेली संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. गर्दी टाळतानाच, मास्क वापरण्याबाबतही वारंवार आवाहन करण्यात येत आहे. शाळांबाबतही सावध पवित्रा घेण्यात आला आहे. मुंबई पालिका हद्दीत तर ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली-मुंबई विमान व रेल्वे सेवा बंद करण्याचाही गंभीरपणे विचार सध्या सुरू आहे.

राज्यात सध्या ७८ हजार २७२ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यात सर्वाधिक १६ हजार ५३१ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर ठाणे जिल्ह्यात हा आकडा १४ हजार २६५ इतका असून मुंबई पालिका हद्दीत सध्या ११ हजार ८२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

One thought on “दिवाळीनंतर कोरोनाच्या दिवाळीला सुरुवात

  1. धक्कादायक बाब आहे, प्रत्त्येकांनी स्वतःची व इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. 🙏🙏

Leave a Reply

error: Content is protected !!