सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या 25 हजारांवर

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाच्या २५ हजारांवर नवीन बाधितांची भर पडली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २५ हजार ६८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पावणेदोन लाखांचा आकडा पार करून पुढे गेली आहे. 

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आल्याने करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यात गेले तीन दिवस रुग्णवाढीचा स्फोट झाल्याचे दिसत आहे. बुधवारी राज्यात २३ हजार १७९ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर गुरुवारी त्यात वाढ झाली व २५ हजार ८३३ रुग्णांची नव्याने भर पडली. करोनाची साथ आल्यापासूनचा हा एका दिवसातील उच्चांक ठरला. त्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यात २५ हजारांवर नवीन रुग्ण आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने आजची आकडेवारी जाहीर केली असून हे आकडे धडकी भरवणारे आहेत. आज राज्यात ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत ५३ हजार २०८ जणांचा या साथीने बळी घेतला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२० टक्के एवढा आहे.

आज राज्यात २५ हजार ६८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २१ लाख ८९ हजार ९६५ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९०.४२ टक्के एवढे आहे. 

Leave a Reply

error: Content is protected !!