24 जिल्ह्यात मात्र परिस्थिती अजूनही ‘ जैसे थे ‘
टीम : ईगल आय मीडिया
गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत मागील 2 दिवसात राज्यातील करोना बाधित रुग्ण संख्या घटली असून एकूण १२ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तरी देखील राज्यातील एकूण २४ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्या कायम असून या २४ जिल्ह्यांमधील करोना रुग्णसंख्या कमी करणे हेच आपल्यापुढील लक्ष्य असल्याचे टोपे यांनी सांगितले.
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ८४.०७ टक्के इतका असून देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ८ टक्के आहे. हे पाहता राज्याचा रुग्णबरे होण्याचा दर हा देशाच्या रुग्ण बरे होण्याच्या दराहून अधिक असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. राज्यभरात मोठ्या प्रमाणवर चाचण्या सुरू असून त्या मुळीच कमी झालेल्या नसल्याचेही टोपे यांनी सांगितले.
सध्या राज्यात अडीच लाख ते २ लाख ८० हजारापर्यंत दररोज करोना चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक असल्याचेही ते म्हणाले. करोना चाचण्यांची संख्या कमी झालेली नसतानाही राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत असल्याचे टोपे म्हणाले. राज्यात रुग्णवाढीबरोबरच पॉझिटिव्हीटीचा दर, मृत्यूदर देखील कमी होत असल्याचे टोपे यांनी सांगितले.
राज्याने केंद्र सरकारकडे ४० हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची मागणी केली होती. पण आपल्याला २० हजार कॉन्सट्रेटर उपलब्ध होतील असे दिसते. लस आणि रेमडेसिव्हीरसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आलेले आहे. काही दिवसात सुमारे साडेतीन लाखांपर्यंत रेमडेसिवीर उपलब्ध होतील, अशी माहितीही टोपे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात ऑक्सिजनची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनची मोठी गरज निर्माण झालेली आहे. यावर उपाययोजना सुरू असून ऑक्सिजनचा अपव्यय टाळण्यासाठी ऑक्सिजन ऑडिटच्या माध्यमातून ऑक्सिजन लीकेज थांबवणे गरजेचं आहे, असे टोपे म्हणाले.
काळजी घेतल्याने शक्य झाले