कोरोनाचं कम बॅक ; पुणे विभागात निर्बंध कडक होणार

आज पुणे विभागाची आढावा बैठक

टीम : ईगल आय मीडिया
राज्यात कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्यामुळे राज्य सरकारने कोरोना संदर्भात तातडीने पावले उचलली आहेत, या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठक विभागीय आयुक्त घेणार आहेत. त्यानंतर कदाचित काही कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून राज्यातील करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना, स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी ( आज ) पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव हे बैठक घेणार असून त्यामध्ये जिल्ह्यात कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या, याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

सौरभ राव हे विभागीय आयुक्त कार्यालयात ही आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.तर सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी हे बैठकीत ऑनलाइन सहभागी होणार आहेत. या बैठकीत पाचही जिल्ह्यांमधील करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपायोजनांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले निर्देश लक्षात घेता ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!