14 दिवस शहरातील 22 खाजगी हॉस्पिटल ना सज्जतेचे आदेश
पंढरपूर : ईगल आय मीडिया
आषाढी यात्रा 10 दिवसांवर आलेली असताना प्रशासन यात्रेच्या आणि कोरोना नियंत्रणाच्या कामात व्यग्र दिसून येत आहे. पंढरपुर तालुक्यात अजूनही 527 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे पंढरपुर चे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आषाढी यात्रेच्या दरम्यान शहरातील 22 खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनास सज्जतेच्या सूचना केल्या आहेत.
दुसऱ्या लाटेत पंढरपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अद्यापही ग्रामीण भागातील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळुन येत आहेत. 10 जुलै पर्यंत तालुक्यात तब्बल 527 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. शुक्रवारी केलेल्या चाचण्यांमध्ये तालुक्यातील 72 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी 8 रुग्ण शहरात तर 64 ग्रामीन भागात आहेत.
त्यातच आषाढी यात्रा 20 जुलै रोजी होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. यात्रेमुळे पंढरपूर शहरात पुन्हा कोरोना वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले असून प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आज शहरातील सर्व हॉस्पिटल व्यवस्थापनास यात्रा काळात सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. डॉक्टर्स, नर्स, सहाय्यक स्टाफ, मेडिसीन्स, रक्त साठा, स्वच्छता, रुग्णवाहिका आदी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.