जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर
माळशिरस : ईगल आय मीडिया
माळशिरस तालुक्यात बुधवारच्या अहवालानुसार कोरोनाचे 200 नवीन रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील कोरोना लाट ओसरत असताना माळशिरस तालुक्यातील रुग्ण संख्या मात्र कमी होताना दिसत नाही. त्यामुळे तालुक्यातील सामान्य नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील कोरोना ची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसते. जिल्ह्यात आजवर सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या पंढरपूर तालुक्यातील रुग्ण संख्या सुद्धा आता वेगाने कमी होत आहे.मात्र माळशिरस तालुक्यातील रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाहीत.
उलट गेल्या काही दिवसांत नवीन रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना बाधित तालुक्यात माळशिरस तालुक्याने दुसरा क्रमांक गाठला आहे. प्रमाण असेच राहिले तर पंढरपूर तालुक्यास मागे टाकून माळशिरस तालुका पहिल्या क्रमांकावर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
माळशिरस तालुका हा सांगली, सातारा, पुणे या तीन जिल्ह्यांना मिळालेला असून अकलूज हे या भागातील मोठे वैद्यकीय केंद्र म्हणून पुढे आले आहे. त्यामुळे येथे संपूर्ण सोलापूर सह लगतच्या 3 जिल्ह्यातील रुग्णांचा संपर्क असतो. त्यामुळे येथील कोरोना रुग्ण नियंत्रणात येत नाहीत असे बोलले जाते.
येत्या आठवड्यात आषाढी यात्रा आली असून पायी वारीला सरकारने बंदी घातली असूनही मोठ्या संख्येने वारकरी पायी चालत पंढरीच्या दिशेने जात आहेत. हे लक्षात घेता आणखी काही आठवडे तालुक्यातील कोरोनाचा धोका कायम असेल असे डॉक्टर्स मंडळींकडून सांगितले जाते.