लसीकरणात सोलापूर जिल्ह्याबाबत दुजाभाव : आ.परिचारक जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पुणे विभागातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याला अत्यंत कमी लसीचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या आठ दिवसापासून तर जिल्ह्यातील लसीकरण यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असल्याने जेष्ठांसह तरूणांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या संदर्भात जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना सोबत घेऊन जिल्हाधिकार्यांना भेटणार आहे, अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
आमदार श्री. परिचारक म्हणाले, अनेकांनी पहिला डोस घेवून तीन महिने उलटून गेले आहेत परंतु अद्याप त्यांना लस मिळू शकलेली नाही. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. पुणे विभागासाठी मागील आठ दिवसात सुमारे दोन लाखाहून अधिक लस मिळाल्या परंतु त्यातून सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीसाठी देखील लस मिळू शकली नाही. अशा परिस्थितीमुळे जिल्ह्यातील लसीकरण यंत्रणा ठप्प झाली आहे.
आषाढी यात्रा जवळ आलेली असल्यामुळे पंढरपूर शहरात वेगाने लसीकरण मोहीम राबवण्याची गरज आहे. असे असताना लसच उपलब्ध होत नसल्याने यंत्रणा ठप्प झाली आहे. यात्रेच्या वेळी पंढरपुरात भाविकांना येण्यास बंदी केलेली आहे. यात्राकाळात पंढरपुरात प्रवेश मिळू शकणार नसल्याने आतापासूनच पंढरपुरात येऊन संत नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी भाविक येऊ लागले आहेत. येत्या काही दिवसात भाविकांची संख्या आणखी वाढणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पंढरपुरात जलदगतीने लसीकरण मोहीम राबून सर्वांचे लसीकरण करणे गरजेचे आहे असे आमदार श्री. परिचारक यांनी सांंगितले.
केंद्राकडून राज्यास मंजूर लसीचे विभागानुसार वाटप होत आहे. पुणे विभागास मागील आठवड्यात २ लाखाहून अधिक लस प्राप्त झाल्या. या पैकी सव्वा लाख एकट्या पुणे जिल्ह्यास, ३० हजार कोल्हापूर जिल्ह्यासाठी, २५ हजार सातारा तर २० हजार सांगली जिल्ह्यासाठी पाठवण्यात आल्या. मात्र सोलापूर जिल्ह्यातील एकाही व्यक्ती साठी लस पाठवण्यात आली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे.
लसीकरणाबाबत सोलापूर जिल्ह्यावर सातत्याने दुजाभाव केला जात आहे. यापूर्वी देखील लस व रेमडेसिवीर इंजक्शन साठी आम्हाला सर्वांना आंदोलन करावे लागले होते. आता पुन्हा जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांशी आपण संपर्क साधत असून जिल्हाधिकारी यांना भेटून शासनाचे लक्ष वेधणार आहे असे आमदार श्री. परिचारक यांनी सांगितले.