लोकांना येतेय दिवंगत आ.भारत भालके यांची आठवण
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहर आणि तालुक्यात 13 ऑगस्टपासून संचारबंदी जाहीर करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळता इत दुकानासाठी कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे शहर व तालुक्यातील व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य दुकानदार, किरकोळ विक्रेते यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. त्याच बरोबर या प्रशासकीय संकट काळात लोकप्रतिनिधी निष्क्रिय दिसत दिसत आहेत, त्यामुळे सर्व पंढरपूरकराना दिवंगत आमदार भारत भालके यांची आठवण प्रकर्षाने येत आहे. अनेक व्यापारी, विक्रेते, दुकानदार आज भारत नाना असते तर, अशी खंत बोलून दाखवत आहेत.
पंढरपूर शहर आणि तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 13 ऑगस्ट पासून तालुक्यातील निर्बंध अधिक कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, विक्रेते यांच्यावर निर्बंध जाहिर केल्याने पुन्हा दुकाने बंद करून घरात बसावे लागणार या काळजीने व्यापारी, विक्रेते, दुकानदार चिंताग्रस्त झाले आहेत.
प्रशासन मन मानेल त्या पद्धतीने निर्बंध लावत असून यास जाब विचारण्याचे, व्यापाऱ्यांच्या बाजूने उभा राहण्याचे धारिष्ट्य लोकप्रतिनिधी दाखवत नाहीत असे दिसते. त्यामुळे पंढरपूरकराना आज त्यांच्यासाठी प्रशासनाला भिडणाऱ्या, अंगावर घेणाऱ्या आणि रस्त्यावर उतरणाऱ्या दिवंगत आम भारत भालके यांची आठवण प्रकर्षाने येऊ लागली आहे.
आषाढी यात्रेमुळे गेल्या 15 दिवसांपूर्वी 8 दिवसांची संचारबंदी शहरात लादली होती, तीतून मोकळीक मिळून आता कुठं व्यापार सुरळीत होऊ लागला होता, तोवर पुन्हा निर्बंध जाहीर केल्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. गेल्या 3 महिन्यापासून शहर आणि तालुक्यातील व्यापारी निर्बंधांच्या विळख्यात गुरफटून गेले आहेत.
रात्री संचारबंदी आदेश निघाला आणि सकाळपासून सोशल मीडियावर दिवंगत आम.भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यांच्या भर भक्कम पाठिंब्याची आणि आधाराची आठवण आज व्यापारी, विक्रेते,नागरिक काढत असल्याचे दिसते.