चक्री वादळ गुजरातच्या दिशेने

महाराष्ट्रात वादळी वारे आणि पाऊस

टीम : ईगल आय मीडिया

मुंबईला या वादळाचा धोका नसला तरी मुंबईत आज ताशी 50 किलोमीटर आणि उद्या ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे मुंबईत जोरदार पावसाची शक्यता असल्याने महापालिकेच्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. हवामान खात्याने तौक्ते चक्रीवादळ मुंबई नजीकच्या समुद्रातून जाणार असल्याचा इशारा दिल्याने महापालिकेने अ‍ॅलर्ट जारी केल्या आहेत.


पालिकेच्या स्तरावर करण्यात आलेली तयारी व सुसज्जता आणि इतर संबंधित यंत्रणांनी केलेली तयारी याचा आढावा मुंबई उपनगरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे व मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 या चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही. तथापि, ते मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. यानुसार 15 मे रोजी मुंबईतील वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. तर रविवार, 16 मे रोजी सायंकाळपासून वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी 60 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. तर त्याच दिवशी काही ठिकाणी हा वेग ताशी 80 किलोमीटर पर्यंत जाऊ शकेल, अशीही माहिती या बैठकीदरम्यान भारतीय हवामान खात्याद्वारे देण्यात आली.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या आढावा बैठकीला अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश निवतकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई पोलीस दलाचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे अतिवरिष्ठ अधिकारी भारतीय हवामान खाते, ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक’ (एनडीआरएफ), मुंबई अग्निशमन दल, ‘बेस्ट’ सह विविध वीज वितरण कंपन्या, मध्य व पश्चिम रेल्वे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम. एम. आर. डी. ए.), मुंबई मेट्रो इत्यादी संस्थांचे व केंद्र शासनाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!