पंढरपूर : ईगल आय मीडिया
पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील दादा चव्हाण, पांडू चव्हाण याच्या कथित टोळीविरूद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याविरूद्ध पुणे विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी राज्याचे अप्पर पोलीस महासंचालकांकडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी मागितली होती. मात्र सबळ पुराव्याअभावी अप्पर पोलीस महासंचालकांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे चव्हाण बंधुसह आणखी एक जनावर लावलेला मोक्का रद्द झाला असून पंढरपूरचे महसूल व पोलीस प्रशासन तोंडघशी पडले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,
पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे डिसेंबर २०१९ मध्ये शेतजमिनीचा वादातून दादा चव्हाण, पांडू चव्हाण, प्रसाद इनामदार, वैशाली इनामदार या चौघांविरूद्ध करकंब पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे आदी कलमांतर्गत गुन्हा नोंद झाला होता. दादा चव्हाण, पांडू चव्हाण या बंधूंविरुद्ध यापूर्वी दोनपेक्षा जास्त गुन्हे आहेत. शिवाय चव्हाण बंधू ४० गुन्हेगारांच्या टोळीचे म्होरके असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव करकंब पोलिसांनी ८ जानेवारी २०२० रोजी पाठवला होता.
८ जानेवारी रोजीच करकंब पोलिसांनी पाठवलेला प्रस्ताव पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मंजूर केला व सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्याकडे सुपूर्द केला होता. प्रस्तुत गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध पुणे येथील मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र ठेवण्यास परवानगी मिळावी, यासाठी अप्पर पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र अप्पर पोलीस महासंचालकांनी पोलिसांनी जोडलेल्या पुराव्याची शहानिशा करून या आरोपींच्या विरूद्ध मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पुरेसा पुरावा उपलब्ध होत नसल्याचे कारण देत सदरचा प्रस्ताव अमान्य केल्याचे सांगितले. यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील कलमे हटवून सदर आरोपींविरुद्ध पंढरपूरच्या प्रथमवर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे, असे आदेशह अप्पर पोलीस महासंचालक यांनी दिले आहेत. त्यानुसार
या आरोपींविरुद्ध पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर आरोपीला पोलीस कस्टडीत बेदम मारहाण करण्यात आली होती. वैधकीय तपसणीनंतर 4 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यामुळे विविध विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे लक्ष या खटल्याकड लागलेले होते.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. ज्ञानेश्वर मोरे, अॅड. संतोष नाईकनवरे, अॅड. लक्ष्मण दांडगे, अॅड. प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे करत आहेत.
हद्दपारीचा आदेशही झाला होता रद्द
यापूर्वी पांडू चव्हाण यांच्यावरील दाखल गुन्ह्यांचा विचार करून प्रांताधिकारी पंढरपूर यांनी त्यास पंढरपूर तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केले होते. मात्र सदरचा हद्दपारीचा आदेशही विभागीय आयुक्त पुणे यांनी रद्द केला होता. याबाबत हद्दपार प्रकरणात तसेच मोक्का प्रकरणात आरोपीतर्फे बाजू मांडणारे अॅड. ज्ञानेश्वर मोरे म्हणाले की, आरोपींविरुद्ध प्रशासनाने सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहेत.
दाखल गुन्ह्यांपैकी बहुतांश गुन्हे सरकारी कामात अडथळा आणला बाबतचे आहेत. आरोपी दादासाहेब चव्हाण अनेक बेकायदेशीर कृत्याविरुद्ध आवाज उठवत असल्याने तसेच तो शासनासाठी ‘जागल्याची’ भूमिका पार पाडत होता. दोन शेतकºयांमधील शेतजमिनीच्या वादाला फौजदारी स्वरूप देऊन चव्हाण बंधूंना मोक्का लावला होता.पांडु चव्हाण याच्यावरील हद्दपारीची कारवाई रद्द झाल्याची माहिती मंजुरी प्रस्तावात पोलिसांनी दिली नाही. त्यामुळेच आरोपींना विनाकारण मोक्का सारख्या कडक कायद्याअंतर्गत कारागृहात सहा महिने काढावे लागले आहेत. याबाबत कायद्यानुसार आपण पुढील दाद न्यायालयात मागणार आहोत.