5 व्या पिढीने साजरा केला 100 वा वाढदिवस


चिंचणीत दादासाहेब सावंत यांचा सपत्नीक संपन्न झाला शतकपूर्ती सोहळा 

पंढरपूर : ईगल आय मीडिया


चिंचणी ( ता.पंढरपूर ) येथील दादासाहेब सावंत यांचा 100 वा वाढदिवस त्यांच्या पाचव्या पिढीतील वारसांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरा केला. यानिमित्त दादासाहेब सावंत यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. ग्रंथ तुला आणि शतकपूर्ती चा आनंद म्हणून गूळ तुला करून त्याचे वाटप समारंभास अलेल्याना करण्यात आले.


चिंचणी या कण्हेर धरणग्रस्त लोकांच्या पुनर्वसन गावातील जेष्ठ नागरिक दादासाहेब कृष्णा  सावंत यांनी वयाची शंभरी पार केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शतकपूर्ती वाटचालीत त्यांच्या सौभाग्यवती अंजीराबाई सावंत यांची साथ अजूनही लाभली आहे. 
हा सुवर्णयोग साधून दादासाहेब सावंत यांच्या पाचव्या पिढीतील वारसांनी एकत्र येऊन शतकपूर्ती निमित्त त्यांचा सत्कार माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, संत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप बापूसाहेब मोरे यांच्या हस्ते केला. यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे प्रमुख उपस्थित होते.


यावेळी दादासाहेब चव्हाण आणि सौ अंजीराबाई चव्हाण यांची ग्रंथ तुला करून सर्व पुस्तके गावातील अभ्यासिकेला दान करण्यात आली. तर गुळ तुला करून आलेल्या नातेवाईक आणि आप्तेष्टांना तो वाटप करण्यात आला. त्यानंतर बापूसाहेब मोरे महाराज यांचे कीर्तन आणि स्नेह भोजन संपन्न झाले. 


यानिमित्ताने दादासाहेब सावंत यांना शुभेच्छा देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील त्यांचे नातेवाईक, सुना, नातवंडे, पतवंडे असे पाचव्या पिढीतील नातेवाईक उपस्थित होते. आपल्या 5व्या पिढीकडून होणारा कौतुक सोहळा पाहून दादासाहेब सावंत हरखून गेल्याचे दिसून आले. यावेळी दादासाहेब यांच्या शतकपूर्ती चे, त्यांच्या आरोग्याचे उपस्थितांनी कौतुक केले. 

Leave a Reply

error: Content is protected !!